एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:56 IST2025-05-02T10:49:08+5:302025-05-02T11:56:36+5:30
How to save Mobile hacking: जर तुम्ही चुकून ती एपीके फाईल डाऊनलोड केली आणि जर तुम्हाला असे हॅक झाल्याचे संकेत मिळाले तर वेळ न दवडता या गोष्टी करा, जेणेकरून तुम्ही होणारे नुकसान टाळू शकाल.

हेमंत बावकर
आजकाल अनेक लोकांची अनेक बँकांमध्ये खाती आहेत. एकाला दुसरे असावे म्हणून उघडून ठेवतात आणि मग फसतात. सध्या ठगांच्या बाजारात केवायसी अपडेट खूप प्रचलित झाले आहे. रेशन कार्ड अपडेट करण्याची सक्ती सरकारने केलीय त्यापासून तर उतच आला आहे. तुमचा मोबाईल नंबर कोणत्या बँकेशी जोडलेला आहे, त्याच्या टेक्स्ट किंवा व्हॉट्सअप मेसेज करून केवायसी अपडेट करण्यास सांगितली जाते. सोबत एपीके फाईल असते, ती डाऊनलोड केली की खेळ खल्लास झाला म्हणून समजा.
सारस्वत बँक असो की एचडीएफसी ती एसबीआय सर्वच बँकांच्या ग्राहकांना असे मेसेज येत आहेत. यामध्ये तुमचे बँक अकाऊंट केवायसी नाही केले तर ब्लॉक होईल असेही सांगितले जाते. यामुळे लोक घाबरून ती एपीके फाईल डाऊनलोड करतात आणि फसतात. तुमचा मोबाईल हॅक होतो, तुमच्या मोबाईलचा सर्व अॅक्सेस या लोकांकडे जातो. तुम्हाला आलेले ओटीपी असतील किंवा अन्य मेसेज असतील ते लोक तुम्हाला लगेचच परत पाठवतात.
केवायसी करताना काय होते...
तुम्ही जर त्यांनी पाठविलेले अॅप इन्स्टॉल केलात किंवा डाऊनलोड केलात तर तो एक मालवेअर असतो. तुमचे फोटो, डॉक्युमेंटचे फोटो आदी सारे त्यांना पाठविले जाते. किंवा जर ते अॅप तुम्ही इन्स्टॉल केले व त्यावर पॅन कार्ड, आधार कार्ड आदी माहिती भरली तर ही माहिती त्यांना मिळते. तुम्हाला या माहितीसाठी ओटीपी पाठविला जातो आणि तुमचे अकाऊंटमधून पैसे काढून घेतले जातात. याचबरोबर तुमच्या बँकेचे अॅप असेल तर ते देखील हॅक केले जाते आणि पैसे वळते केले जातात.
काय करू नका...
अनोळखी नंबरवरून किंवा ओळखीच्या नंबरवरून देखील कोणतीही एपीके फाईल डाऊनलोड करू नका. कोणत्याही वेबसाईटवरून डाऊनलोड करू नका. मोबाईलमध्ये २०० रुपयांपासून वर्षाची व्हॅलिडिटी असलेला अँटीव्हायरस मिळतो, तो इन्स्टॉल करा. जेणेकरून अशा प्रकाराची तुम्हाला माहिती मिळेल. मोबाईलवरून कोणत्याही अश्लिल वेबसाईटला भेट देऊ नका, बँकांच्या किंवा अन्य अधिकृत वेबसाईटच ओपन करा. फोन वेळोवेळी स्कॅन करा.
जर हॅक झाला तर काय कराल...
जर तुम्ही चुकून ती एपीके फाईल डाऊनलोड केली आणि जर तुम्हाला असे हॅक झाल्याचे संकेत मिळाले तर वेळ न दवडता या गोष्टी करा, जेणेकरून तुम्ही होणारे नुकसान टाळू शकाल.
मोबाईलमधील फोटो, फाईल्स महत्वाच्या असतील तर लगेचच रजिस्टर अँटिव्हायरस असलेल्या कॉम्प्युटरवर त्याचा बॅकअप घ्या, मोबाईलवरील इंटरनेट कनेक्शन बंद करा. व्हॉट्सअप बॅकअप घेतलेला नसेल तर इंटरनेटशी जोडलेला असतानाच तो घ्या. तुम्हाला ज्या नंबरवरून मेसेज आला तो ब्ल़ॉक करायला विसरू नका.
सर्व बॅकअप घेऊन झाल्यावर तुमचा मोबाईल सेटिंगमध्ये जाऊन पूर्णपणे फॅक्टरी फॉर्मॅट करा. नंतर तुमचा डेटा पूर्णपणे रिक्त झालेल्या मोबाईलमध्ये पुन्हा घ्या, अँटीव्हायरस इन्स्टॉल करायला विसरू नका. अँटीव्हायरस घेताना गुगल प्लेस्टोअरवरूनच घ्या, थोडे पैसे जातील परंतू भविष्यातील फिशिंग किंवा सायबर हल्ल्यांपासून संरक्षण मिळेल.