भाजपाच्या माजी आमदाराचा भव्यदिव्य बंगला; मुख्यमंत्र्यांनाही पडली भुरळ, पाहा PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 23:24 IST2025-01-05T23:05:27+5:302025-01-05T23:24:27+5:30

पुण्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका बंगल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. भाजपाचे माजी आमदार जगदीश भुरळ यांच्या नव्या बंगल्याने अनेकांना भुरळ घातली आहे. मुळीक यांनी त्यांच्या बंगल्याची खास झलक त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.
पुण्यातील अगदी प्रशस्त जागेत बांधलेला हा बंगला पाहून तुमचेही डोळे दिपतील. शुभ्र पांढऱ्या रंगात असलेल्या या बंगल्याचा खास व्हिडिओ समोर आला आहे. त्यात बंगला, बंगल्यासमोरील भलेमोठे अंगण, चारही बाजूला असलेली सुरक्षेची भिंती दिसून येते.
माजी आमदार जगदीश मुळीक यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ८ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला असून त्याला २१ हजार जणांनी लाईक्स केला आहे. त्याशिवाय दीड हजाराहून अधिक लोकांनी कमेंट करून मुळीक यांचं अभिनंदन करत बंगल्याचेही कौतुक केले आहे
या बंगल्याच्या आत जाताच तुम्हाला प्रशस्त वास्तू दिसते. त्यात लोकांच्या बसण्यासाठी सोफे, खुर्च्या, घरात हवा खेळती राहावी यासाठी मोठी खिडकी, मध्यभागी आलिशान झुंबर दिसून येते.
इतकेच नाही तर बंगल्यात देवाऱ्यासाठी वेगळं मंदिराची खोली आहे. त्यात सागवानाचे लाकडी मंदिर दिसून येते. मुळीक यांनी नुकतेच त्यांच्या नव्या घराची वास्तूशांती आणि सत्यनारायणाची पूजा घातली होती.
बंगल्यात येणाऱ्या लोकांच्या आसनाची उत्तम व्यवस्था, त्याशिवाय बैठकीसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त असं किचन, राहणाऱ्या लोकांसाठी एखाद्या हॉटेलसारखं सुंदर बेडरूम, खोलीच्या चहू बाजूला लख्ख प्रकाश पडेल अशी मांडणी करण्यात आली आहे.
त्याशिवाय मास्टर बेडरूममध्ये मोठा पलंग, त्याशेजारी सोफा आणि २ खुर्च्या आणि टीपॉय, प्रत्येक खोलीत आणि हॉलमध्ये टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे.
जगदीश मुळीक यांच्या नव्या घराच्या वास्तूशांती कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी सत्यनारायण पूजेचं दर्शन घेत मुळीक कुटुंबाशी संवाद साधला. त्याशिवाय मुळीक यांनी आर्वजून फडणवीसांना त्यांच्या नव्या घराची झलक पाहण्याचा आग्रह धरला.
जगदीश मुळीक हे भाजपाचे पुण्यातील नेते असून त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी होती. २०१४ च्या निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघात मुळीक अल्पमताने निवडून आले होते. परंतु २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
२०२४ च्या निवडणुकीत जगदीश मुळीक लोकसभा लढवण्यात इच्छुक होते. परंतु पक्षाने येथून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली. त्यानंतर वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा उमेदवार वडगाव शेरी मतदारसंघात उभा होता. यावेळीही मुळीक नाराज झाले परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली होती.