'आरओ'मधील पाणी किती शुद्ध ? क्षारयुक्त पाण्याने अनेकांच्या शारीरिक व्याधी वाढतीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:55 IST2026-03-10T17:26:05+5:302026-03-10T17:55:55+5:30
उन्हाळा लागताच गावागावात प्रत्येक घरात जारचे पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. प्रत्यक्षात हे जार कोणत्या पाण्याने भरले जातात ? याची कसलीही माहिती नागरिक घेताना दिसत नाहीत. जार दिसला की फिल्टरचे पाणी आणि शुद्ध पाणी समजून लोक पितात; पण तुम्ही पिताय ते पाणी फिल्टरचे की विहिरीचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

फिल्टरचे पाणी असल्याचे सांगून चक्क विहिरीच्या पाण्याची विक्री केली जाते. हा प्रकार सर्वात जास्त लग्नसराईच्या हंगामामध्ये केला जातो. आता विहिरीचे पाणी कमी आणि जारमधून येणारे पाणी खरेदी केले जाते; परंतु जारमध्ये येणारे पाणी विहिरीचे किंवा फिल्टरचे आहे हे तपासणे गरजेचे आहे. अनेक लोक पाण्यापासूनही पाण्यासारखा पैसा कमवत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर क्षारयुक्त पाणी असल्याने शारीरिक व्याधी निर्माण होत असल्याने शहर असो की खेडेगाव, या ठिकाणचे लोक शुद्ध पाणी पिण्यासाठी आग्रही असतात. गावोगावी जारचे प्लांट झाले आहेत.

एक जार ३० रुपयांना - एका जारमध्ये १५ लिटर पाणी दिले जाते. हे १५ लिटर पाणी ३० रुपयाला दिले जाते. आजघडीला शहरच नव्हे तर ग्रामीण भागातही पाण्याचे जार लग्नासाठी मागवले जातात, एका लग्न समारंभाला कमीत कमी २०० जार मागवले जातात. शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो किंवा नाही, याची अचानक पाहणी अन्न व औषध प्रशासनाने करणे गरजेचे आहे; परंतु तसे केले जात नाही.

आरओ प्लांटमध्ये नेमकी शुद्धीकरणाची प्रक्रिया काय? - आरओ मशीनमध्ये तीन प्रकारचे फिल्टर असतात. यात टीडीएस ५० च्या वर असायला हवे. फिल्टर वेळोवेळी बदल करणे गरजेचे आहे. बोअरच्या पाण्यात माती, लोह, क्षार आणि कार्बन असते त्यामुळे ते वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे.

शुद्धीकरणासाठी पाणी येते तरी कुठून ? - सध्या प्रत्येक गाव, वस्तीमध्ये बहुतांश नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी जारला पसंती देतात; पण हे पाणी किती शुद्ध आहे, याची कसलीच खात्री नसते. असे असतानाही पाण्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो; पण आपण पीत असलेले हे पाणी फिल्टरचे की विहीर, बोअर किंवा अन्य कुठल्या ठिकाणाहून भरून थेट जारमध्ये भरले जाते, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.

या पाण्याची कधी तपासणी होते का? - पाण्याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून क्वचितच पाऊल उचलले जाते. त्यामुळे शुद्ध पाण्याच्या नावावर विहिरीचे पाणी दिले जाते. यासंदर्भात कुणी तक्रार करायलाही पुढे येत नाही. तक्रार नसल्याने तपासणी व कारवाई होत नाही.

आरओ आणि बॉटलिंग प्लांटचे नियम काय ? - आरओचे पाणी विक्रीला आयएसओ नामांकनाची गरज नाही; मात्र बॉटलिंग प्लांटला आयएसओ नामांकनाची गरज आहे.

















