गर्भाशय मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी सरकार मुलींना मोफत लस देणार; लवकरच जिल्ह्यांमध्ये मोहीम सुरू होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 20:21 IST2026-03-06T20:10:48+5:302026-03-06T20:21:24+5:30
महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेत मोठी पावले उचलली आहेत. देशातील १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी 'ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' (एचपीव्ही) लसीकरण मोहीम देशभर राबविण्याची तयारी सुरू आहे. 'गार्डासिल' ही लस मोफत देण्यात येणार असून, ती एकाच डोसच्या स्वरूपात दिली जाणार आहे.

या निर्णयामुळे भविष्यात सर्व्हिकल कॅन्सरच्या रुग्णसंख्येत मोठी घट होण्याची अपेक्षा आहे. यामुळे मुलींचे भविष्यही सुरक्षित होणार आहे. पालकांनी न घाबरता आपल्या मुलीच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी लस देणे गरजेचे आहे. आपल्या मुलीचे आरोग्य सुदृढ ठेवणे महत्त्वाचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पहिल्या टप्प्यात निवडक जिल्ह्यांमध्ये मोहीम सुरू होऊ शकते. यानंतर टप्प्याटप्प्याने देशभर विस्तार केला जाईल, अशी माहिती आहे.

एचपीव्ही म्हणजे काय? - 'ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' (एचपीव्ही) हा संसर्गजन्य विषाणू आहे. याच्या काही प्रकारांमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ शकतो.

लसीची किंमत ३,९२७ रुपये - 'गार्डासिल' लसीची बाजारातील किंमत सुमारे ३ हजार ९२७ रुपये आहे. सरकार ही लस मोफत देणार असल्याने सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

८५ टक्क्यांपर्यंत संरक्षण - तज्ज्ञांच्या मते, एचपीव्ही लसीकरणामुळे सव्हिकल कॅन्सरपासून सुमारे ८५ टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळू शकते. लस घेणे हे सुरक्षित आणि प्रभावी प्रतिबंधक पाऊल मानले जाते.

नोंदणी आणि कुठे मिळणार लस ? - शाळांमार्फत विद्यार्थिनींची नोंदणी केली जाणार आहे. जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातही लस उपलब्ध असेल. आरोग्य विभागाकडून स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत.

सेर्विकल कॅन्सर महिलांत दुसरा सामान्य कर्करोग - गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. दरवर्षी हजारो महिलांचे या आजारामुळे निधन होते. लवकर निदान आणि लसीकरण हा प्रतिबंधाचा प्रभावी मार्ग मानला जातो.

१४ वर्षे वयोगटातील मुलींना लस मोफत दिली जाणार आहे. - देशभरातील सर्व शाळा व सरकारी आरोग्य केंद्रांमार्फत लसीकरण मोहीम राबवली जाईल. यासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी उपलब्ध केला जाणार आहे.

















