शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी, माधवराव शिंदे ते..., अजितदादांआधी ‘या’ बड्या नेत्यांचा झालाय विमान अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:28 IST

1 / 7
आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक काळा अध्याय घेऊन आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं. अजित पवार यांच्या अकाली जाण्यामुळे राज्याला धक्का बसला असून, अजितदादांचे समर्थक शोकसागरात बुडाले आहेत. दरम्यान, भीषण विमान अपघातांमध्ये याआधीही देशातील अनेक बड्या नेत्यांचे निधन झाले आहे. त्यातील काही प्रमुख नेते खालील प्रमाणे.
2 / 7
देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे नेते संजय गांधी यांचं २३ जून १९८० रोजी राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं होतं. अपघात झालेलं विमान संजय गांधी हे स्व:तच चालवत होते. सफदरजंग विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे विमान कोसळले आणि त्यात संजय गांधी यांचा मृत्यू झाला.
3 / 7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे यांचंही एका भीषण विमान अपघातात निधन झालं होतं. ३० सप्टेंबर २००१ रोजी माधवराव शिंदे आणि इतर सहा जणांना घेऊन जाणारे खाजगी विमान उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातील एका गावात कोसळले होते. या अपघातात माधवराव शिंदे यांच जागीच मृत्यू झाला होता.
4 / 7
लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष आणि तेलगू देसम पक्षाचे नेते डॉ. जी.एम.सी. बालयोगी यांचं ३ मार्च २००२ रोजी झालेल्या एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं होतं. हा अपघात आंध्र प्रदेशमध्ये झाला होता.
5 / 7
आंध्र प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले वायएस राजशेखर रेड्डी यांचे २ सप्टेंबर २००९ रोजी रुद्रकोंडा हिल येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं होतं. त्या दिवशी सकाळी बेगमपेट येथून चित्तूर येथे एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी रेड्डी हे विमानातून रवाना झाले होते. मात्र वाटेतच त्यांचं हेलिकॉप्टर बेपत्ता झालं होतं. नंतर त्यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात होऊन त्यात त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं होतं.
6 / 7
अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचाही एका भीषण हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. ३० एप्रिल २०११ रोजी सकाळी तवांग येथून इटानगर येथे निघाले असताना ते प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर दुर्गम भागात कोसळले होते. या अपघातात खांडू यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता.
7 / 7
१२ जून २०२५ रोजी गुजरातमधील अहमदाबातमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात गुजकातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं होतं. या अपघातात रुपाणी यांच्यासह २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाVijay Rupaniविजय रूपाणीIndiaभारत