आनंद दिघेंच्या शेवटच्या काळात शिवसेनेतून...; जुन्या शिवसैनिकाचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 06:08 PM2022-08-03T18:08:19+5:302022-08-03T18:12:22+5:30

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात बंड पुकारत थेट उद्धव ठाकरेंच्याविरोधात भूमिका घेतली. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आणि इतर १२ अपक्षांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आणि सरकार अल्पमतात आले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं.

शिवसेनेच्या इतिहासात आजपर्यंत इतके मोठे बंड आजतागायत कुणी केले नव्हते. शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत असं सांगत मविआ सरकार पाडले. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागले. खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने केला जाऊ लागला.

त्यात एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात जात आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा काढत आहेत. माझे वडील आजारपणात असताना गद्दारांनी डाव साधला. ज्या लोकांवर विश्वास दाखवला त्यांनीच विश्वासघात केला. सरकार पाडून पुन्हा भाजपासोबत हातमिळवणी केली. या गद्दारांनी उद्धव ठाकरेंच्या पाठित खंजीर खुपसला अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंकडून बंडखोर आमदारांवर सातत्याने होत आहे.

उद्धव ठाकरेंनीही मी हॉस्पिटलला असताना पक्षाची जबाबदारी ज्या नेत्यांवर विश्वासाने टाकली त्यांनीच दगा दिला. माझे हातपाय हलत नव्हते. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून खाली ओढण्याचं पाप या विश्वासघातकी लोकांनी केले. माझ्या आई वडिलांचे फोटो लावून मत मागू नका. हिंमत असेल तर तुमच्या आई बापाचे फोटो लावा, मत मागा आणि जिंकून येऊन दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी केले.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तुम्ही आमचे आई-बाप का काढता?, सत्तेसाठी विश्वासघात कोणी केला?, असा सवाल उपस्थित करत मलाही आता भूकंप करावा लागेल, असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर देखील भाष्य करणार असल्याचं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्याने ठाण्यात खळबळ माजली आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यूचे गुढ २० वर्षांनंतरही देखील कायम आहे. आनंद दिघेंना जिल्हाप्रमुख असताना काय त्रास झाला? आनंद दिघे यांना ठाणे जिल्हाप्रमुख पद सोडायला सांगितले होते का? अशा विविध चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे. परंतु यावर फारसं कुणी उघडपणे बोलत नाही. मात्र जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असतील तर नक्कीच मोठा भुकंप होईल असा विश्वास ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव जगताप यांनी व्यक्त केला.

आनंद दिघेंना शेवटच्या काळात शिवसेना पक्षातून मोठा विरोध होऊ लागला होता असा खुलासा ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव जगताप यांनी केला. आनंद दिघेंच्या शेवटच्या काळात नेमकं काय घडलं त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सविस्तर सांगू शकतात. आम्ही बोलणं उचित राहणार नाही. ते बोलण्याचा अधिकार शिंदेंना आहे. आम्ही बोलल्याने भूकंप होणार नाही. काही गोष्टी आम्हाला माहिती नसणं बऱ्या आहेत असं जगताप यांनी म्हटलं.

त्याचसोबत राजन विचारे यांचं अज्ञान आहे. केवळ टार्गेट करायचं यासाठी विचारे काम करतात. खोट्या गोष्टी पसरवू नका. शिंदे जर दिघेसाहेबांच्या मृत्यूबद्दल बोलले तर भूकंप होईल तर त्याची वाट पाहा. आनंद दिघे असते तरी त्यांनी हेच केले असते. त्यांच्यावर सुद्धा अन्याय झाला होता. दिघेंवर वरून त्रास देण्यात आला. जिल्हाप्रमुख म्हणून तो त्रास त्यांनी सोसला. दिघेंवर जो अन्याय झाला त्याला सर्वाधिक जबाबदार राजन विचारे होते. ते मातोश्रीवर जाऊन सातत्याने तक्रारी करायच्या. दिघेसाहेब असते तर आज घडलंय ते झालेच असते. ते बाळासाहेबांनाही आवडलं असतं असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड नाही तर उठाव आहे. बंड केले असते तर दुसऱ्या पक्षात गेले असते. अजूनही ते शिवसेनेतच आहे. बाळासाहेबांना वंदनीय मानतात. शिवसैनिक आहेत सांगतायेत. त्यामुळे गद्दार हा शब्द वापरणं चुकीचे आहे हे कुणी मान्य करणार नाही अशा शब्दात शिवसैनिक उद्धवराव जगताप यांनी आदित्य ठाकरेंना फटकारलं आहे.