बैलगाडा शर्यतींमुळे वाढला 'भाव', अनेकांना रोजगाराची संधी; ग्रामीण भागात 'आड्ड्या'ची 'क्रेझ'

By ओमकार संकपाळ | Published: May 29, 2023 04:15 PM2023-05-29T16:15:46+5:302023-05-29T16:19:35+5:30

बैलगाडा शर्यतीमुळे केवळ मनोरंजनच होत नसून अनेकांच्या हाताला काम मिळत आहे.

ग्रामीण भागातील तरूणाईला आपलंस करणारा आणि बळीराजाच्या मित्राच्या जीवावर लाखोंची कमाई करून देणारा खेळ म्हणजे 'बैलगाडा शर्यत'. बैलगाडा शर्यतीचं नातं गावा खेड्यासाठी काही नवीन नाही. दोन वर्षापूर्वी मोठ्या कालावधीनंतर शर्यतींवरची बंदी हटली अन् घाटावर पुन्हा एकदा 'यात्रा' भरायला लागली.

बैलगाडा शर्यतीमुळे केवळ मनोरंजनच होत नसून अनेकांच्या हाताला काम मिळत आहे. खरं तर पूर्वी बैलगाडा शर्यत आणि यात्रा-जत्रा हे ग्रामीण भागातील यात्रांचे खरे समीकरण होते. पण काळाच्या ओघाप्रमाणे सर्वकाही बदलत गेले आणि राजकारणी मंडळी आपल्या प्रचाराचं एक साधन म्हणून शर्यतींचं आयोजन करू लागले.

शर्यतीत सहभागी होणारे बैलगाडा मालक, चालक, स्पॉन्सर इत्यादींमधून आर्थिक घडा बांधला जातो. खासकरून छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना रोजगाराची संधी देणाऱ्या या शर्यती ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला हातभार लावत आहेत.

स्पर्धा कोणतीही असो त्यामध्ये मानधनाचे प्रमाण कमी जास्त असू शकते पण पैशांशिवाय कशाचाच 'श्रीगणेशा' होत नाही हेही तितकंच खरं. बळीराजाच्या आवडत्या खेळात देखील पैशांचा बोलबाला चालतो. विजेत्या बैलगाडा मालकाला बक्षीस म्हणून मोटारसायकल, जेसीबी अथवा थार गाडी अशी महागडे बक्षीसे ठेवली जातात. याशिवाय एक लाख एक रूपया, एकावन्न हजार एक रूपया अशी बक्षीसे ठेवली जातात.

समाजातील पुढारलेली मंडळी, यात्रा कमेटी आणि राजकीय मंडळी अशी लोक प्रामुख्याने शर्यतीचं आयोजन करत असतात. बैलगाड्यांप्रमाणे 'घाटावर' बघ्यांची संख्या देखील लक्षणीय असते. यामुळे छोटे-मोठे विक्रेते वडापाव, कच्ची दाबेली यांसह अन्य पदार्थाचे स्टॉल लावून बैलगाडा प्रेमींची भूक भागवण्याचे काम करतात.

तसेच बैलांचे साहित्य यामध्ये आसूड, दोऱ्या यांसह अन्य बाबी देखील घाटावर उपलब्ध असतात. शर्यतींमुळे बघ्यांची भूक भागवणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांच्या हाताला काम मिळते शिवाय अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळते आहे. विजेता बैलगाडामालक गुलालाच्या विजयात रंगून जातो, हा गुलाल देखील घाटावर रोजगार देत असल्याचे दिसते.

लक्षणीय बाब म्हणजे एखाद्या बैलगाडा मालकाकडे स्वत:चा चालक नसेल तर भाडे तत्वार काम करण्यास इतर चालक तयार असतात. बाजार भावाच्या तुलनेत काही ठिकाणी घाटावरचे पदार्थ महाग असले तरी शौकिनांसाठी ते सोयीचे पडते.

कच्ची दाबेली (२० रूपये), वडापाव (१५), कलिंगड (१ प्लेट, २० रूपये), सरबत (१ ग्लास १० रूपये), बिस्लेरी (२० रूपये बॉटल), गोळा (१० रूपये), काकडी (१० रूपयाला एक), (भजी (१५ रूपये प्लेट), असे काही पदार्थ आड्ड्यावर शौकिकांना भुरळ घालतात.

बैलगाडा शर्यतीला परवानगी देणाऱ्या कायद्याला अलीकडेच अर्थात १८ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. बैलगाडा शर्यतीचे कायदे वैध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह बैलगाडा शौकिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी हटवल्यानंतर आजतागायत घाटावर 'भिर्र'चा थरार सुरू आहे. बैलगाडा शर्यत हा केवळ एक खेळच नसून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारा घटक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.