थर्टी फर्स्टच्या रात्री ही चूक-भूल करू नका...! पोलिसांपासून वाचण्यासाठी या टिप्स कामी येतील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 11:11 IST2024-12-31T11:02:10+5:302024-12-31T11:11:21+5:30

New Year Celebration tips: अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अनेकांनी थर्टी फर्स्टच्या पार्टीची जय्यत तयारी सुरु केली आहे. काही जण फॅमिलीसोबत तर काही जण मित्र मैत्रिणींसोबत पार्ट्यांना जाणार आहेत.

नवे वर्ष उजाडायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अनेकांनी थर्टी फर्स्टच्या पार्टीची जय्यत तयारी सुरु केली आहे. काही जण फॅमिलीसोबत तर काही जण मित्र मैत्रिणींसोबत पार्ट्यांना जाणार आहेत. तमाम जनतेचा हा थर्टी फर्स्ट सुखरूप जावा यासाठी पोलीस दलही तयारीला लागले आहे. एकट्या पुण्यात तीन हजार पोलीस रस्त्या रस्त्यांवर तैनात असणार आहेत. मुंबईतही अशीच संख्या असणार आहे. या रात्री ही चूक भूल करू नका, नाहीतर येते वर्ष तुम्हाला खूप महागात पडण्याची शक्यता आहे.

थर्टी फर्स्ट म्हटल्यावर ओली पार्टी ही येतेच. या रात्री बहुतांशजण दारु पिऊनच गाड्या चालवितात. काहीजण हे सोबत दारु न पिणारा मित्र असेल तर त्याची घरी जाण्यासाठी मदत घेतात. काही वर्षांपूर्वी बार, रेस्टॉरंट मालकांना ग्राहकाला घरी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते. आताही ते काही जण ऑफर करतात. परंतू, अनेकजण नववर्षाचा उत्साह आणि दारुच्या उन्मादात पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. यापासून वाचण्यासाठी काय कराल...

पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे दारु पिऊन गाडी चालवू नका. जर मद्यपान करणार असाल तर सोबत असा मित्र घ्या की तो निर्व्यसनी असेल. जो तुमची स्कूटर, बाईक किंवा कार चालवू शकेल. पोलिसांनी जर पकडलेच तर तुम्ही पुढील कारवाईपासून वाचू शकता. या कारवाईत तुरुंगाची हवा, लायसन जप्त, वाहन ताब्यात घेणे आदीचा समावेश असतो.

जरी तुम्ही मद्यपान केलेले नसले तरी वाहतुकीचे नियम पाळण्यास विसरू नका. कार असेल तर सीटबेल्ट लावा, स्कूटर असेल तर हेल्मेट घाला. यामुळे ट्रॅफिकच्या पावत्यांपासून तुम्हाला वाचता येईल व समोरून किंवा मागून कोणी बिल्डर बाळ जात-येत असेल तर त्याच्यापासूनही संरक्षण मिळेल. तुम्हीच तुमचे तारणहार ठरू शकाल.

पार्टी करत असताना मोठमोठ्याने म्युझिक लावणे, आरडाओरडा करणे टाळा. तुमच्यासोबतच इतरही एन्जॉय करण्यासाठी येत असतात, शेजारी पाजारी यांना त्रास होऊ शकतो, याचे भान ठेवा.

तुमच्याकडे जे कोणते वाहन असेल, त्याची कागदपत्रे यात आरसी बुक, तुमचे लायसन, इन्शुरन्स, पीयुसी ही कागदपत्रे तयार ठेवा. पोलिसांनी तुम्हाला थांबविलेच तर ती सादर करता यायला हवीत. नाहीतर त्याचा फाईन नाहक बसू शकतो. शक्यतो अशी वाहनेच रस्त्यावर आणा.

नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात सिग्नल पाळा, ओव्हरस्पीड करू नका. वेगवेगळे स्टंट करू नका. तुमच्यामुळे कोणाला दुखापत झाल्यास त्याचे नववर्ष किंवा त्याचे आयुष्य उध्वस्त होईल असे वागू नका. हे काही नियम पाळा, नववर्षाचे आनंदात स्वागत करा.