थेट आझाद मैदानातून... 'तब लढे थे गोरों से, अब लढेंगें बीजेपी के चोरों से'

By महेश गलांडे | Published: January 25, 2021 03:42 PM2021-01-25T15:42:58+5:302021-01-26T07:20:03+5:30

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीही पाठिंबा दिला. राज्यातील विविध शेतकरी संघटनांनीही या मोर्चाला आणि आंदोलनाला पाठिंबा दिला असून केंद्र सरकारप्रती रोष व्यक्त केलाय.

आजच्या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शेकापचे जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते, माजी मंत्री नसीम खान, भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबु आझमी, डाव्या पक्षांचे नेते  अशोक ढवळे, नरसय्या आडम, अजित नवले, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, खा. कुमार केतकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, रामकिशन ओझा, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह विविध संघटनांचे नेते व हजारो शेतकरी उपस्थित होते.

आझाद मैदानातील आंदोलनालास पाठिंबा देत मंंचावर उपस्थित असलेल्या दिग्गजांनी मोदी सरकावर तोफ डागली. तसेच, शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकार पाठ फिरवत असल्याचेही सांगितले.

देशाच्या इतिहासात आतापर्यंत कोणताही वाद न होता दीर्घकाळ चाललेले आंदोलन म्हणून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाकडे पाहावे लागेल. जात, धर्म, प्रांत यावर आंदोलन फोडण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र आंदोलन फुटले नाही. - हनन मुल्ला, राष्ट्रीय सचिव अखिल भारतीय किसान सभा

खा. शरद पवार साहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी काम केले, शेतकऱ्यांसाठीच्या कायद्यांमध्ये चांगले बदल केले, पवार साहेबांनी शेतकऱ्यांना हमीभाव दिला, कृषी कायदे करताना केंद्र सरकारने त्यांच्या सूचना घ्यायला हव्यात."- जयंत पाटील, शेकाप नेते

शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनावर मोदी सरकारने अश्रुधुराचा वापर केला, हायवे खणले, पाण्याचे फवारे सोडले तरी शेतकरी तिथे ठाण मांडून बसलेत. दीडशे शेतकरी आंदोलनात हुतात्मे झाले. केंद्र सरकारच्या या असंवेदनशीलतेचा आपण आज जळजळीत निषेध करत आहोत- डॉ. अशोक ढवळे,अध्यक्ष,ऑल इंडिया किसान सभा

शेतकरी आणि कामगार नेते एकत्र पाहायला मिळाल, मोदी सरकारच्या कृषी विषयक धोरणांचा या सर्वच नेत्यांनी विरोध केला.

"पंतप्रधान मोदीसाहेब आपण शरद पवार साहेबांचा हात पकडून बारामतीला गेलात, मग कृषी कायदा करताना एकदा तरी पवार साहेबांसोबत बोलायचं." - मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते नरसय्या आडम मास्तर यांची केंद्र सरकारवर टीका

आझाद मैदानातील हा एल्गार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची ताकद वाढवणारा ठरणार असून तो देशाला दिशा देणारा ठरणार आहे. मोदी सरकारने कामगार व शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला असून आता तुमचा सातबारा (७/१२) भांडवलदारांच्या नावावर करण्याचा डाव रचला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसलूमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधी विचारपूस केली का, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारला आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलक करणारे शेतकरी पंजाबचे असल्याचं सांगतात. पंजाब काय पाकिस्तानमध्ये येतं का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेनं भव्य मोर्चाचं आयोजन केलं. या मोर्चाला पवार यांनी आझाद मैदानात संबोधित केलं.

तब लढे थे गोरो से अब लढेंगे बीजेपी के चोरो से.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध करतो इतका माज लोकशाहीत चालत नाही..

मुंबईतील आझाद मैदानात शेतकऱ्यांनी व कामगारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लाल बावटा आणि कम्युनिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात उत्साह दिसून आला. यावेळी, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.