CoronaVirus News: महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार?; दिलासादायक माहिती समोर

Published: May 7, 2021 11:20 AM2021-05-07T11:20:30+5:302021-05-07T11:25:20+5:30

CoronaVirus News: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम; तीन आठवड्यांपासून कठोर निर्बंध लागू असूनही रुग्णसंख्येत लक्षणीय घट नाही

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव थांबताना दिसत नाही. गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. मात्र तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली नाही.

कोरोनाची दुसरी लाट वेगानं पसरत असल्यानं राज्यात १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू झाले. मात्र तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळालेली नाही.

बुधवारी राज्यात ५६ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. काल हा आकडा ६२ हजारांच्या पुढे पोहोचला. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना मृतांचा आकडादेखील वाढत आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पुढील ५ ते १० दिवसांत कमी होईल, अशी शक्यता केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. महाराष्ट्रासोबतच दिल्ली, पंजाबमधील कोरोनाची दुसरी लाटदेखील लवकरच ओसरेल, असा अंदाज आहे.

राज्य सरकारनं लागू केलेले कठोर निर्बंध आणि नागरिकांनी बाळगलेली सतर्कता याचा परिणाम लवकरच महाराष्ट्रात दिसून येईल, असं आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र, दिल्लीमधील कोरोना रुग्णांची संख्या येत्या ५ ते १० दिवसांत घटेल. त्यामुळे आता केंद्रानं आपली संसाधनं बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडूसारख्या राज्यांत वापरायला हवीत, असं अधिकारी म्हणाले.

राष्ट्रीय स्तरावर एकाएकी कोरोनाचे रुग्ण कमी होणार नाहीत. स्थानिक, राज्य पातळीवर कोरोना रुग्णांची संख्या कमी होत जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

देशात सध्या कोरोनाचे नवे हॉटस्पॉट तयार झाले आहेत. दक्षिणेतील राज्यांमध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. त्यामुळे देशाचं टेन्शन वाढलं आहे.

कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्य सरकारांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र अद्याप तरी त्याचा परिणाम दिसून आलेला नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!