CoronaVirus News: कोरोनाचा कहर! ४ जिल्ह्यांनी राज्याची चिंता वाढवली; 'या' एकाच जिल्ह्यात मराठवाडा, विदर्भाच्या दुप्पट रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 10:08 AM2021-08-06T10:08:54+5:302021-08-06T10:12:21+5:30

CoronaVirus News: महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती; आरोग्य विभागासमोर मोठं आव्हान

राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लसीकरणाला गती देण्याची गरज आहे.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या सध्या तरी नियंत्रणात आहे. मात्र चार जिल्ह्यांनी संपूर्ण राज्याची चिंता वाढवली आहे. मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

जुलैच्या अखेरीस पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कोरोना टेस्टिंग, ट्रेसिंगवर परिणाम झाला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढला आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये कोरोनानं थैमान घातलं आहे. या चार जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर वाढला आहे. या जिल्ह्यांमधील आकडेवारी संपूर्ण राज्याची काळजी वाढवणारी आहे.

साताऱ्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ९५१ नव्या रुग्णांची नोंद झाली. सांगलीत ६७२, कोल्हापूरात ८२०, तर सोलापूरात ६०१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले.

सातारा जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णवाढीच्या आकडेवारीनं जिल्हा प्रशासनाची झोप उडवली आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्यानं सगळ्यांचीच धाकधूक वाढली आहे.

एकट्या सातारा जिल्ह्यातली कोरोना आकडेवारी धडकी भरवणारी आहे. गेल्या २४ तासांत साताऱ्यात ९५१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांपेक्षा दुप्पट आहे.

गेल्या २४ तासांत मराठवाड्यात एकूण ३८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. विदर्भातील सर्व जिल्ह्यांत मिळून ७२ नवे रुग्ण सापडले. विदर्भ आणि मराठवाड्यात मिळून २४ तासांत ४५७ रुग्ण आढळले. तर एकट्या साताऱ्यात कोरोनाचे ९५१ नवे रुग्ण आढळले.

राज्यातील १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र ११ जिल्ह्यांमधील निर्बंध कायम आहेत. त्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरचा समावेश होतो. या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातले निर्बंध लागू आहेत.