परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 09:02 IST2025-07-21T08:42:03+5:302025-07-21T09:02:05+5:30

राज्याचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात एक मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला तो म्हणजे हनी ट्रॅप...राज्याचे आजी-माजी मंत्री, वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोप विरोधकांनी केला. काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभेत हे आरोप केल्यानंतर मोठी खळबळ माजली.

मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहेत. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्त्वांच्या हाती पोहोचत आहेत असा दावा काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी करत हनी ट्रॅपचे चित्रिकरण असलेला पेन ड्राईव्ह सभागृहात दाखवला.

तर हनी ट्रॅपमुळे सरकारच्या कामकाजातील गुप्तता, महत्त्वाच्या फाईल्स बाहेर गेल्या आहेत. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्य नाही यातून मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंगचे प्रकार होत आहेत असा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम २९१ अन्वये सभागृहात प्रस्ताव मांडला. मात्र हा प्रस्ताव सभापतींनी नाकारला.

अधिवेशनात हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा सुरू होती. त्यावर अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. राज्यात ना हनी, ना ट्रॅप आहे, हनी ट्रॅपचे कुठलेही प्रकरण समोर नाही. त्याबाबत तक्रार नाही, पुरावे नाहीत असं फडणवीसांनी सभागृहात सांगितले.

सभागृहात हनी ट्रॅपची चर्चा सुरु आहे. कोणचा हनी ट्रॅप आणला मला समजतचं नाही. नाना पटोलेंचा बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपच्या प्रकरणाची तक्रार नाही. अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

त्याशिवाय अशा संदर्भातील एक तक्रार नाशिकमधून आली होती. एका महिलेने तक्रार केली आणि ती मागेही घेतली. उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भातील ही तक्रार होती. आपण सातत्याने व्यक्तीचा हॉटेलचा उल्लेख करत होता. ती व्यक्ती काँग्रेसची अध्यक्ष आहे. त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली होती.

प्रकरण चर्चेत कसं आले? - महसूल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवल्यानंतर सुरुवातीला त्याच्याकडे ३ कोटींची मागणी झाली. ती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा १० कोटींची मागणी करण्यात आली. तेव्हा संबंधित अधिकारी अस्वस्थ झाला आणि या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटल्याची चर्चा आहे.

अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या एका अधिकाऱ्याने अब्रूच्या भीतीने ३ कोटी रुपये दिले, १० कोटींची मागणी झाल्यावर त्याने पैसे देण्यास नकार दिला. संबंधित महिलेने नाशिक पोलिसांकडे तोंडी तक्रार दिली. पोलिसांनी अधिकाऱ्याला विचारणा केली असता आम्ही समन्वयाने तोडगा काढतो असं त्याने सांगितले. त्यानंतर या महिलेने लेखी तक्रार पोलिसांकडे दिली.

तक्रार नसल्याने पोलीस हतबल - या काळात संबंधित अधिकारी ठाणे येथे गेले असता त्यांची प्रकृती बिघडली. तेथे त्याने या महिलेविरोधात तक्रार केली. मात्र पुन्हा उभयंतात काही समझोता होऊन परस्परविरोधी तक्रारी मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. संबंधित अधिकारी आणि अन्य कोणाचीही अधिकृत तक्रार नसल्याने पोलिसही हतबल झाले आहेत.

भाजपा नेत्याच्या निकवटर्तीयाला अटक - जळगावच्या पहूर येथील प्रफुल्ल लोढा यांच्यावर मुंबई येथील साकीनाका व अंधेरी पोलिस ठाण्यात हनी ट्रॅप, पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक झाली. प्रफुल्ल लोढा भाजपा नेते गिरीश महाजन यांचे निकटचे असल्याचे खडसेंनी दावा केला. ६२ वर्षीय प्रफुल्ल लोढा यांच्यावर नोकरीचं आमिष दाखवून १६ वर्षीय मुलगी आणि तिच्या मैत्रिणीसोबत अश्लील वर्तवणूक केल्याचा आरोप आहे