भाजपनं शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता, एकनाथ शिंदेंनी सांगितलं नक्की काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 03:29 PM2022-08-14T15:29:39+5:302022-08-14T15:42:18+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांच्या कालावधीत नक्की काय घडलं आणि मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का?, यावर भाष्य केलं.

महाराष्ट्रात सत्ता बदल होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होत आला. महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तारही पार पडला. एकनाथ शिंदे यांनी आणि काही आमदारांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. नंतर भाजपच्या मदतीनं त्यांनी राज्यात सरकारही स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

जो निर्णय अडीच वर्षांपूर्वीच घ्यायला हवा होता, तो नंतर घेतला असंही शिंदेंनी स्पष्ट केलं. तसंच महाराष्ट्राच्या जनतेनं भाजप आणि शिवसेनेला कौल दिला होता. त्यामुळे जनतेचाही सन्मान होणं गरजेचं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुरूवातील देवेंद्र फडणवीस यांनी आपण सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु नंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.

ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनगौरव सोहळ्यादरम्यान विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्याव्यतिरिक्त महाविकास आघाडीवरही भाष्य केलं. “सरकारमध्ये आपल्या आमदारांना सन्मानानं वागणूक दिली जात नव्हती. त्या सरकारच्या माध्यमातून काहीही योग्य होत नव्हतं. आमच्या आमदारांना काम करण्यासाठी निधी मिळत नव्हता. बोलण्यासाठी आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री होती, परंतु कोणताही सन्मान मिळत नव्हता. ज्या पक्षासोबत आपली विचारधारा मिळत आहे, त्यांच्यासोबत हातमिळवणी केली पाहिजे, असं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मी प्रत्यक्ष अमित शाहंची भेट घेतली तेव्हा त्यांना विचारलं. अमित शाह यांनाच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही मी बोललो. त्यांनी मला सव्वा ते दीड तास दिला होता. जर आम्ही बिहारमध्ये नितीश कुमार यांचे आमदार कमी असताना मुख्यमंत्री बनवू शकतो आणि तुमचे ५० असताना, भाजपचे १०६ असताना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू शकतो. जर आम्ही शब्द दिला असता तर का फिरवला असता असं त्यांनी चर्चेदरम्यान सांगितलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

“महाविकास आघाडी सत्तेत आली तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी माझं नाव होतं का नाही हे मला माहित नाही. मी मुख्यमंत्रिपदासाठी हे पाऊल उचललेलं नाही. कोणावर टीका करण्याचा, पातळी सोडून बोलण्याचा माझा स्वभाव नाही. हे का झालं, हा निर्णय आम्ही का घेतला. हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं. मला आजही मी राज्याचा मुख्यमंत्री आहे वाटत नाही. मी आजही तसाच कार्यकर्ता आहे असं वाटतं,” असंही ते विचारलेल्या प्रश्नला उत्तर देताना म्हणाले.

मुलाखतीदरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद घेऊन चूक केली का? असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी आपण यावर बोलू शकत नाही, हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे असं म्हणाले. “आम्ही जो मार्ग पत्करला आहे, तो बाळासाहेबांच्या विचारांचा, भूमिकेचा मार्ग होता. त्यांनी भाषणातही सांगितलं होतं काँग्रेस राष्ट्रवादी आपले मित्र होऊ शकत नाही. हे आपले शत्रू आहे, त्यांना जवळ करता येणार नाही. अशी वेळ आली तर आम्ही दुकान बंद करू असं ते म्हणाले होते. आम्ही काय चुकीचं केलं,” असंही ते मुलाखतीदरम्यान म्हणाले.

आम्ही जनतेनं कौल दिला होत्या त्याच भाजपसोबत आलो आहोत, त्यात आम्ही चुकलो कुठे? असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस राष्ट्रवादी तर जाहिरपणे पुढचा मुख्यमंत्री आमचाचा आहे, १०० पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत, शिवसेनेच्या आमदाराच्या ठिकाणी जाऊन सभा घेणं अशा गोष्टी सुरू असतात. साधा आमदार व्हायला खुप कष्ट घ्यायला लागत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

“भाजप हा सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी काहीही करतो हे सुरू होतं. पण या निर्णयात पंतप्रधान, नड्डा यांनी निर्णय घेऊन सर्वांची गणितं चुकीची ठरवली. बाळासाहेबांचा सैनिक म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. आधी शिवसैनिक मुख्यमंत्री बनणार असं म्हणत होते. परंतु दुर्देवानं ते झालं नाही. ते भाजपनं केलं. त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद दिले,” असंही शिंदे म्हणाले.