मुंबईकरांना मोठे गिफ्ट! गोव्यासाठी विशेष ट्रेन, २० कोच वंदे भारत; UP-बिहारच्या दोन सेवा कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 14:45 IST2026-03-31T14:28:47+5:302026-03-31T14:45:02+5:30
रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विविध विशेष सेवा सुरू केल्या असून, एक वंदे भारत ट्रेन १६ कोचवरून २० कोच करण्यात आली आहेत.

उन्हाळी सुट्टयांमुळे वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते गोवा मार्गावर साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या समन्वयाने हा निर्णय घेतल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.

गाडी क्रमांक ०१०१९ ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून प्रत्येक रविवारी रात्री १२.५५ वाजता ५ एप्रिल ते ७ जून २०२६ या कालावधीत सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी ३.१५ वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. परतीची गाडी (०१०२०) मडगाव येथून रविवारी सायंकाळी ४.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.५० वाजता मुंबईत पोहोचेल.

महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस अधिक क्षमतेसह धावणार असून, या गाडीमध्ये कोचची संख्या वाढवण्यात येत आहे. मुंबई ते अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आहे. त्यामुळे या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी कायम असते.

वंदे भारत एक्सप्रेसच्या वाढलेल्या क्षमतेमुळे मुंबई – गुजरात प्रवास अधिक सोयीस्कर, वेगवान आणि आरामदायी होईल. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर मुंबई-अहमदाबाद वंदे भारत ट्रेनचे कोच १६ वरून २० करण्यात आले होते. त्याला आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई-अहमदाबाद या महत्त्वाच्या मार्गावर भारतीय रेल्वेकडून धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे २० डब्यांच्या स्वरूपात येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे अधिक प्रवाशांना प्रवासाची संधी मिळेल. प्रतीक्षा यादीत घट होईल. आरामदायी आणि जलद प्रवास होईल.

तसेच गाडी क्रमांक १२९३३/१२९३४ मुंबई सेंट्रल – वटवा / अहमदाबाद – मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेसचे टर्मिनस मुंबई सेंट्रलवरून बदलून वांद्रे टर्मिनस करण्यात आले होते. यालाही आता मुदतवाढ देण्यात आली आहे. १ एप्रिल ते २७ एप्रिलपर्यंत या सेवा आत्ता आहेत, त्या स्वरुपात असणार आहेत.

दरम्यान, मध्य रेल्वेवरून दादर ते गोरखपूर ट्रेन अलीकडेच कायमस्वरूपी करण्यात आली. तसेच आता उत्तर प्रदेशकडे जाणारी दादर – बलिया आणि बिहारकडे जाणारी लोकमान्य टिळक टर्मिनस – दरभंगा अशा दोन नवीन रेल्वेगाड्या कायमस्वरूपी केल्या आहेत.

गाडी क्रमांक ०१०२७/०१०२८ दादर-गोरखपूर-दादर विशेष ही गाडी नियमित गाडी क्रमांक ११०४७/११०४८ दादर-गोरखपूर-दादर एक्स्प्रेस म्हणून चालवली जाईल.

गाडी क्रमांक ०१०२५/०१०२६ दादर-बलिया-दादर विशेष गाडी नियमित गाडी क्रमांक ११०४३/११०४४ दादर-बलिया-दादर एक्स्प्रेस म्हणून चालवली जाईल. तसेच, गाडी क्रमांक १३३७९/१३३८० दरभंगा ते लोकमान्य टिळक टर्मिनस कायमस्वरूपी करण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी साप्ताहिक असेल आणि दर बुधवारी चालवण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.

















