Ajit Pawar Plane Crash : संशयालाच 'हवा'! अजित पवारांचे विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास केंद्राचा नकार, 'आरटीआय'मधील उत्तर काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 09:07 IST2026-02-20T08:58:45+5:302026-02-20T09:07:52+5:30

Ajit Pawar Plane Crash : केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागाने ही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे आता अपघात प्रकरणी पुन्हा एकदा संशय उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यादव यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संशयाचे वातावरण असतानाच, आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी त्या दिवसाचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज मागवले होते, परंतु केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागाने ही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे आता अपघात प्रकरणी पुन्हा एकदा संशय उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यादव यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ज्या दिवशी विमान अपघात झाला (२८ जानेवारी २०२६), त्या दिवशी पहाटे ६ ते सकाळी ९ या दरम्यान मुंबई विमानतळावर नक्की काय हालचाली सुरू होत्या, हे जाणून घेण्यासाठी नितीन यादव यांनी १० फेब्रुवारी रोजी माहिती अधिकारांतर्गत (RTI) अर्ज केला होता. मात्र, अनेक वेळा पाठपुरावा करूनही केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाने ही माहिती नाकारली आहे.

दरम्यान, याबाबत नितीन यादव यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. "अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून संविधानिक पदावर काम करणारे लोकप्रतिनिधी आणि शासकीय जनसेवक होते. अशा महत्त्वाच्या व्यक्तीच्या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज नाकारणे हे अत्यंत धक्कादायक आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे हा घातपात असण्याच्या शंकेला अधिक बळ मिळत आहे."

माहिती नाकारल्याच्या निर्णयाविरोधात यादव यांनी आधी अपील दाखल केले आहे. यात त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय माहिती आयुक्त यांच्या विविध निकालांचे दाखले देऊन पुन्हा फुटेजची मागणी केली आहे.

त्या दिवशी पहाटे ६ ते ९ दरम्यान अजितदादा त्यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानापासून ते मंत्रालयापर्यंत कोणत्या मार्गाने गेले, याचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडेही स्वतंत्र आरटीआय अर्ज दाखल केला आहे.

अजितदादांच्या निधनानंतर राज्यभरातील जनतेमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये या अपघाताबाबत मोठी शंका आहे. यामुळे आता चौकशीची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अनेक नेत्यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केल्यानंतर, आता अजितदादांचे पुत्र जय पवार यांनी या प्रकरणावर अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. "विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत, मग सत्य बाहेर का येत नाही?" असा सवाल करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

"विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत; महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून, त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे", असे जय पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले आहे.

अजित पवार यांच्या अपघातानंतर राजकीय वातावरण आधीच संवेदनशील असताना, जय पवार यांच्या या विधानामुळे संशयाची सुई अधिक गडद झाली आहे. निष्पक्ष आणि सखोल चौकशी झालीच पाहिजे, यावर त्यांनी ठाम मते मांडली आहेत.

जय पवार यांच्या या मागणीनंतर आता सरकार आणि तपास यंत्रणा यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः व्हीएसआर कंपनीच्या तांत्रिक तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.