ATC चा कंट्रोल विमान प्रशिक्षण संस्थेच्या हाती; कोणाच्या भरवशावर चालतो बारामती एअरपोर्ट? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 13:33 IST2026-01-29T13:27:11+5:302026-01-29T13:33:17+5:30

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती एअरपोर्टजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने बारामती एअरपोर्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. हा असा एअरपोर्ट होता जिथे बऱ्याच VVIP लोकांच्या विमानाचं लँडिंग होते, अखेर त्याकडे कुणाचं लक्ष का गेले नाही असा प्रश्न तयार होतो.

DCGA ने स्वत: बारामती हे एक अनियंत्रित विमानतळ आहे, जिथे हवाई वाहतूक सेवा आणि माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाऐवजी विमान प्रशिक्षण संस्थांद्वारे पुरवली जाते असं मान्य केले आहे. त्यामुळे हे एअरपोर्ट कुणाच्या भरवशावर चाललंय हा प्रश्न आहे.

पुण्यापासून ९५ किमी अंतरावर असलेले बारामती एअरपोर्टजवळ २ ट्रेनिंग एकेडमी आहे. रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग एकेडमी आणि एकेडमी ऑफ कार्वर एविएशन प्रायव्हेट लिमिटेड. या फिल्डमधून उड्डाण घेणाऱ्या अनेक विमानांसोबत दुर्घटना घडली आहे परंतु त्यात कुणाचाही जीव गेला नाही. महाराष्ट्र एअरपोर्ट डेवलपमेंट कंपनी(MADC) च्या वेबसाईटनुसार, बारामती हे महाराष्ट्रातील १५ राज्यातंर्गत विना परवाना असलेल्या एअरपोर्टपैकी एक आहे. हे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेवलपमेंट कॉर्पोरेशन(MIDC) कडे आहे. त्यावर बारामती एअरपोर्ट लिमिटेड मॅनेजमेंट करते.

बारामती एअरपोर्टवर ७७१० फूट लांबीचा रनवे बनवला आहे. या एअरफिल्डचे मॅनेजर शिवाजी तावरे यांनी म्हटलं की, ही धावपट्टी ९० च्या दशकात पहिल्यांदा बनवली होती. जवळपास ४५० एकरमध्ये हा परिसर आहे. या एअरपोर्टवर दर महिन्याला ६-७ चार्टर फ्लाईट उतरतात. ज्यात बहुतांश नेत्यांची असतात. एअरफिल्ड २००९ साली विकासासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या स्टेप डाऊन सब्सिडियरी कंपनीला लीजवर दिली होती. परंतु डेवलपमेंट आणि फ्लाईट्स कमी असल्याचे कारण देत MIDC ने २०२५ मध्ये पुन्हा यावर नियंत्रण घेतले होते.

बारामती एअरपोर्ट इमारतीत २ कॅबिन आणि १ खोली आहे. या एअरपोर्टचा वापर मुख्यत: प्रशिक्षणासाठी केला जातो. त्यासाठी एका फ्लाइंग स्कूलद्वारे चालवणारा बेसिक एअर ट्रॅफिक कंट्रोल(ATC) सेटअप इथे आहे. डीजीसीएच्या मते, या सुविधेतील एटीसी सपोर्ट विद्यार्थी किंवा तेथे कार्यरत असलेल्या फ्लाइंग स्कूलमधील प्रशिक्षकांकडून पुरवले जाते.

बुधवारी VVIP लँडिंगमुळे ATC ला कार्वर एविएशनच्या एका फ्लाइट इंस्ट्रक्चरकडून मॅनेज केले जात होते. व्हीव्हीआयपी लँडिंगसाठी आम्ही बारामती नगरपरिषदेकडून अग्निशमन दलाला सज्ज राहण्यास सांगितले होते. विमान कोसळल्याचे कळताच आम्ही बारामती नगरपरिषदेकडून आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अधिक अग्निशमन दलाला बोलावले आणि ते तातडीने पोहोचले. एक रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आली होती असं विमानतळ प्रभारी शिवाजी तावरे यांनी सांगितले.

ATC नुसार, दुर्घटनेवेळी विजिबिलिटी ३ किलोमीटर होती, ज्यामुळे पायलटने पहिली लँडिंग रद्द केली होती. एअरस्ट्रीपसाठी आवश्यक विजिबिलिटी रेंज ५ किमी इतकी आहे. या विमानतळाला अनियंत्रित विमानतळाच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे कारण येथे सामान्य विमानतळासारखी पायाभूत सुविधा नाहीत. याठिकाणी ATC सपोर्टही एका विमान प्रशिक्षक संस्थेकडून केला जातो. ज्यांच्याकडे फक्त बेसिक सुविधा आहे.

भारतीय विमानतळे चार श्रेणींमध्ये विभागली आहेत. श्रेणी A विमानतळे अनियंत्रित आहेत, ज्यामध्ये हवाई वाहतूक नियंत्रण सेवा नाहीत. बारामती या श्रेणीत येते. श्रेणी B विमानतळे अंशतः नियंत्रित आहेत, मर्यादित ATC किंवा AFIS सेवांसह. श्रेणी C विमानतळे नियंत्रित विमानतळे आहेत जी प्रक्रियात्मक ATC सह चालतात, जिथे विमाने रडारऐवजी प्रक्रिया वापरून वेगळी केली जातात. श्रेणी D विमानतळे रडार-आधारित ATC सह पूर्णपणे नियंत्रित विमानतळे आहेत, ज्यात मुंबई आणि दिल्ली सारख्या प्रमुख केंद्रांचा समावेश आहे.

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर भारतीय वायूदलाने तातडीने बारामती विमानतळावर एक टीम तैनात केली. जी ATC चं नियंत्रण करेल. ही टीम घटनास्थळापासून सुरक्षित हवाई ऑपरेशन्स सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत एटीसी आणि हवामानशास्त्रीय सेवा प्रदान करण्यासाठी काम करेल.

निवृत्त वैमानिक एहसान खालिद म्हणतात की, बारामती विमानतळावर एक लहान धावपट्टी आहे, परंतु लिअरजेटसारख्या विमानांना उतरण्यासाठी ती पुरेशी आहे. या अपघातात धावपट्टीची काही भूमिका होती असे मला वाटत नाही, कारण ही दुर्घटना धावपट्टीच्या बाहेर घडली आहे. म्हणून ती धावपट्टीची चूक नाही. पण हो, जर धावपट्टीवर आयएलएस (इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम) किंवा कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत पायलटला अचूक मार्गदर्शन करू शकणाऱ्या इतर उपकरण प्रणाली असत्या तर हा (अपघात) टाळता आला असता असं त्यांनी सांगितले.