फाशीच्या 7 वर्षानंतर याकूब मेमन चर्चेत, कबरीवरुन शिवसेना-भाजपचे राजकरण; नेमका वाद काय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 05:17 PM2022-09-08T17:17:53+5:302022-09-08T17:20:53+5:30

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमला 7 वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली. पण, आता त्याच्या कबरीवरुन महाराष्ट्रात राजकारण सुरू झाले आहे.

1993 मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते, या स्फोटांमध्ये 257 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोषी ठरल्याने याकुब मेमनला 2015 मध्ये फाशी देण्यात आली. पण, आता याकुब मेमन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी याकुबच्या कबरीवरून राजकारण केले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकुब मेमनच्या कबरीचे समाधीत रूपांतर केल्याचा आरोप भाजप करत आहे. तर, शिवसेनेचे म्हणणे आहे की, महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने याकुबचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवला होता. आता मुंबई पोलिसांनीही याप्रकरणी तपास सुरू केला आहे. जाणून घेऊया काय आहे प्रकरण आणि याकुब मेमनला फाशी दिल्यानंतर 7 वर्षांनी वाद का सुरू झाला?

याकुबला फाशी दिल्यानंतर त्याला मरीन लाइन्स रेल्वे स्थानकासमोरील 7 एकरावर पसरलेल्या 'बडा स्मशानभूमी'मध्ये दफन करण्यात आले होते. आता याकुब मेमनच्या कबरीचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात याकूब मेमनची कबर संगमरवरी फरशांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. हा फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. वाद वाढल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, डीसीपी दर्जाचा अधिकारी या प्रकरणाची चौकशी करेल. याबाबत वक्फ बोर्ड, धर्मादाय आयुक्त आणि बीएमसी यांच्या प्रश्नांची उत्तरेही पोलीस देतील.

भाजप नेते राम कदम यांनी याकुबच्या कबरीचे काही फोटो शेअर केले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकुब मेमनच्या कबरीचे समाधीत रूपांतर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांनी मुंबईकरांची माफी मागावी, असे भाजप नेते राम कदम म्हणाले.

याकुब मेमनची कबर उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये बांधण्यात आली, असे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या विचारांशी कशी तडजोड केली हे यातून दिसून येते. दहशतवाद्यांचा गौरव करणाऱ्या गद्दारांना का सोडले जाते याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे. एवढेच नाही तर या प्रकरणाची चौकशी करून दोषींना अटक करण्याची मागणी भाजपने केली.

शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले जाऊ नयेत, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. पण, तरीदेखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना याकुबचा मृतदेह कुटुंबीयांकडे का सोपवण्यात आला. कबरीच्या देखभालीची जबाबदारी बीएमसीची नाही तर ट्रस्टची आहे. शिवसेनेला हिंदुद्रोही ठरवण्याचा अजेंडा भाजप चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोढे म्हणाले की, ही भाजपची जाणीवपूर्वक केलेली चूक आहे. काँग्रेसच्या काळात अफझल गुरू आणि कसाब या दोन दहशतवाद्यांना फाशी देण्यात आली होती. दोघांनाही गुपचूप दफन करण्यात आले. ओसामा बिन लादेनच्या बाबतीतही अमेरिकेने असेच केले. पण याकुबला फाशी झाली तेव्हा भाजपची सत्ता होती. भाजपने जाणीवपूर्वक अंत्यविधीला परवानगी देऊन तमाशा घडू दिला.

स्मशानभूमीच्या कर्मचार्‍यांना व्हायरल फोटोबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की अशा अनेक कबरी आहेत, ज्या संगमरवराने सजवल्या गेल्या आहेत. काही लोकांनी आपल्या नातेवाइकांसाठी स्मशानभूमीत बरीच जागा घेतली आहे, ज्यासाठी ते वार्षिक शुल्क भरतात. याकुब मेमनची कबर ज्या ठिकाणी आहे, ती जागा फार पूर्वीपासून घेतली आहे. याकुब मेमनच्या कबरीजवळ आणखी 3 कबरी आहेत.