कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 13:57 IST2025-08-17T13:51:47+5:302025-08-17T13:57:30+5:30

Kolhapur Circuit Bench interior Photo's : सरन्यायाधीश गवई उद्घाटक : मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट वैचचे रविवारी (दि. १७) दुपारी साडेतीन वाजता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. त्यानंतर मेरी वेदर ग्राउंडवर उ‌द्घाटन समारंभ होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे प्रमुख पाहुणे आहेत, तर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी करवीर नगरी सज्ज झाली आहे. गेल्या ४२ वर्षांच्या लढ्यानंतर अखेर कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंचचे स्वप्न सत्यात उतरत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फीत कापून सीपीआरसमोरील सर्किट बेंच इमारतीचे उ‌द्घाटन होईल.

मेरी वेदर ग्राउंडवर उ‌द्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. या समारंभासाठी सहा जिल्ह्यांतून सुमारे पाच हजार जण उपस्थित राहाणार आहेत. यात सहा जिल्ह्यांतील मंत्री, लोकप्रतिनिधी, आजी-माजी न्यायाधीश, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वकील, पक्षकार आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असेल.

सुमारे ४५० व्हीआयपी पाहुणे उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे सीपीआरसमोरील सर्किट बेंच परिसर आणि मेरी वेदर ग्राउंडवर कडेकोट सुरक्षाव्यवस्थेसह बंदोबस्त तैनात केला आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यामुळेच सर्किट बॅचचा निर्णय झाल्याची कोल्हापूरकरांची भावना आहे. यामुळे तमाम कोल्हापूरकर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. बहुतांश वकिलांनी गवई यांचे फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला लावून त्यांचे विशेष आभार मानले आहेत.

सर्किट बेंच उ‌द्घाटन समारंभासाठी सहा जिल्ह्यातील सुमारे तीन हजार वकील उपस्थित राहणार आहेत. जिल्हा बार असोसिएशनने वकिलांना ऑनलाइन नोंदणीसाठी लिंक उपलब्ध करून दिली आहे. यावर अडीच हजारांहून जास्त वकिलांची नोंदणी झाली आहे.