कौतुकास्पद! हजारो प्राण्यांना जीवनदान देणाऱ्या 'रसिला वाढेर'!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 08:39 PM2020-08-10T20:39:36+5:302020-08-10T21:30:31+5:30

आयएफएस अधिकारी परवीन कसवान यांनी एक फोटो शेअर केला आहे. तसेच, या फोटोला कॅप्शन सुद्धा लिहिली आहे. रसिला वाढेर यांना भेटा, त्या गीरमधील वनपाल (फॉरेस्टर) आहेत. आतापर्यंत त्यांनी 1000 हून अधिक प्राण्यांना रेस्क्यू केले आहे, असे म्हटले आहे.

रसिला यांनी रेस्क्यू केलेल्या प्राण्यांमध्ये 300 सिंह, 500 बिबट्ये, मगरी आणि अजगर यांच्या समावेश आहे. त्यांनी या प्राणांना विहिरीतून वाचविले आहे. तसेच, त्या जंगलाच्या राजापेक्षा अधिक आत्मविश्वासाने याठिकाणी फेरफटका मारतात, असे परवीन कासवान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

रसिला या गुजरातच्या गीर राष्ट्रीय उद्यानात कार्यरत आहेत. वनविभागातील प्राण्यांना रेस्क्यू करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहे. 2007 साली त्यांनी वनकर्मचारी पदाची परीक्षा दिली होती. यापूर्वी त्या वन्यजीविका (वाइल्ड लाइफ) मार्गदर्शक होत्या.

2007 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. त्यावेळी त्यांनी येथील वन विभागात महिलांची टीमची स्थापना केली. जंगलात महिला तैनात करणारे गुजरात हे पहिले राज्य होते.

तेव्हापासून महिला येथे वाघ आणि सिंह यांच्या व्यतिरिक्त अनेक वन्य प्राण्यांची काळजी घेत आहेत. त्यापैकी एक रसीला देखील आहेत.

2008 पासून रसिला यांनी जंगलात जाण्यास सुरुवात केली. वन्य प्राण्यांजवळ जाणे, त्यांची काळजी घेणे हे त्यांना आधीपासूनच आवडत होते. त्यामुळे त्यांनी प्राण्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये भाग घेण्यास सुरूवात केली. आतापर्यंत त्यांनी अनेक वन्य प्राण्यांना जीवनदान दिले आहे.

रसिला यांनी एका वृत्तपत्राला सांगितले होते की, प्राण्याला कधीही रेस्क्यू करण्यासाठी जावे लागते, त्यामुळे कामासाठी ठराविक तासच काम करायचे, असे नाही. कोणत्याही परिस्थितीत कॉल येताच त्याठिकाणी पोहोचावे लागते आणि रेस्क्यू काम करावे लागते.

रसिला यांनी अनेक जंगली प्राण्यांना रेस्क्यू केले आहे. त्या प्राण्यांना इंजेक्शन देतात.जर त्यांना दुखापत झाली तर ते मलम-पट्टी करतात. हे एक अतिशय जबाबदारीचे काम आहे.