तब्बल ४४ प्लॅटफॉर्म असलेलं जगातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्यात एक गुप्त रेल्वे ट्रॅकही लपवलाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:54 IST2026-02-07T15:25:00+5:302026-02-07T15:54:44+5:30

World Largest Railway Station: ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे केवळ एक रेल्वे स्टेशन नसून, ते इतिहास, वास्तुकला आणि आधुनिक वाहतुकीचं अद्भुत उदाहरण आहे.

World Largest Railway Station: जगभरात प्रवासासाठी ट्रेन हे एक महत्त्वाचं माध्यम मानलं जातं. भारतात तर रेल्वे ही दळणवळणाची सर्वात मोठी व्यवस्था आहे. भारतात साधारण ७ हजार ३०० हून अधिक रेल्वे स्थानकं आहेत. कोलकात्याचं हावडा हे मोठं स्टेशन असो किंवा ओडिशातील बांसपानी हे लहान स्टेशन असो, भारतीय रेल्वे अनेक रंजक कथा सांगते. पण आज आपण ज्या रेल्वे स्टेशनबद्दल जाणून घेणार आहोत, त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलेलं आहे.

जगातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन म्हणजे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ग्रँड सेंट्रल टर्मिनल (Grand Central Terminal). हे स्टेशन तब्बल ४८ एकर क्षेत्रफळावर पसरलेलं असून, एका छताखाली तब्बल ४४ प्लॅटफॉर्म असलेलं हे जगातील एकमेव रेल्वे स्टेशन आहे. याच वेगळेपणामुळे याचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवलं गेलं आहे.

ग्रँड सेंट्रल टर्मिनलचं बांधकाम १९०३ ते १९१३ या काळात करण्यात आलं. म्हणजेच हे स्टेशन जवळपास १२६ वर्षे जुनं आहे. या स्टेशनची रचना राजवाड्यासारखी भव्य आणि देखणी आहे. त्यामुळे इथे लोक फक्त ट्रेन पकडण्यासाठीच नाही, तर त्याचं सौंदर्य पाहण्यासाठीही येतात. हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये या स्टेशनचं चित्रीकरण झालं आहे.

हे स्टेशन दोन अंडरग्राउंड लेव्हल्समध्ये बांधलेलं आहे. वरच्या स्तरावर ४१ ट्रॅक, तर खालच्या स्तरावर २६ ट्रॅक आहेत.

या स्टेशनचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथला गुप्त प्लॅटफॉर्म. हा प्लॅटफॉर्म स्टेशनजवळील वॉल्डॉर्फ अ‍ॅस्टोरिया हॉटेलच्या खाली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट या प्लॅटफॉर्मचा वापर करत असत, अशी माहिती आहे. मात्र, हा प्लॅटफॉर्म कधीही सर्वसामान्य प्रवाशांसाठी वापरण्यात आलेला नाही.

या भव्य स्टेशनवर दररोज ६६० हून अधिक गाड्या थांबतात. रोज साधारण १ लाख २५ हजार प्रवासी येथून प्रवास करतात, त्यामुळे इथे नेहमीच प्रचंड गर्दी पाहायला मिळते.

भारतामध्ये कोलकात्याचं हावडा रेल्वे स्टेशन हे सर्वात मोठं रेल्वे स्टेशन आहे. येथे २३ प्लॅटफॉर्म आणि २५ हून अधिक रेल्वे ट्रॅक आहेत.

ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे केवळ एक रेल्वे स्टेशन नसून, ते इतिहास, वास्तुकला आणि आधुनिक वाहतुकीचं अद्भुत उदाहरण आहे.