वावर हाय तर पावर हाय! १० वी पास बाईनं शेतात बनवलं जबरदस्त आयलँड; आता होतेय लाखोंची कमाई

By manali.bagul | Published: November 25, 2020 02:00 PM2020-11-25T14:00:24+5:302020-11-25T14:16:28+5:30

उत्तरप्रदेशातील कन्नोजमधील एका दहावी पास महिलेलं असं काही केलंय. ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. या महिलेनं आपल्या शेतात आयलँड तयार केलं आहे. शेतात पाण्याची समस्या होती आणि त्याच समस्येला या महिलेनं हत्यार बनवलं आहे. या महिलेनं आपल्या शेतातील जमीनीत एक लहानसे आयलँड तयार केले आहे. हे पाहून सगळेचजण अवाक् झाले आहेत.

हे आयलँड पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येतात. हे ठिकाण सगळ्यांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. इतकंच नाही तर गूगलने एक सन्मान पत्र देऊन या महिलेला गौरवलं आहे.

कन्नौजच्या तिर्वा तहसील क्षेत्रातील बधुइंया गावाच्या रहिवासी असलेल्या किरण कुमारी राजपूत यांच्याकडे २३ बीघा जमीन आहे. त्यांच्या जास्तीत जास्त शेतात पाणी भरायचं. त्यामुळे त्यांना शेतीच्या समस्यांचा सामना करावा लागत होता. मग त्यांनी विचार केला की, शेतातल्या पाण्याला तलावाचे रूप दिले जावे.

त्यानंतर किरण कुमारी यांनी शेतात पाणी भरण्याच्या समस्येचं हत्यार बनवत २०१६ मध्ये जल प्लावन योजनेच्या अंतर्गत प्रशासनाकडून ३ लाख रुपये घेतले. त्यानंतर वाचवलेले पैसे, नातेवाईकांनी दिलेले पैसे एकत्र करून मासेमारीचा व्यवसाय सुरू केला. २३ बीघा जमिनीवर तलावाचे काम सुरू करण्यासाठी एकूण ११ लाख रुपयांचा खर्च आला.

नफा मिळाल्यानंतर त्यांनी मुलगा शैलेंद्रच्या मदतीने या तलावाला व्यापक रुप देण्याचा विचार केलाआहे. तलावात एक बीघा जागेत आयलँड तयार केला. त्यात आंबे, पेरू, केळी, पपई आणि काही फुल झाडं लावून बगीचा तयार केला आहे. पाण्याच्या मधोमध असलेले हे आयलँड आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. या ठिकाणी फिरण्यासाठी लांबून लांबून लोक येतात. या व्यतरिक्त लोक बोटिंगचाही आनंद घेतात.

किरण यांच्या अनुपस्थित त्यांचा मुलगा शैलेंद्र या आयलँडची देखरेख करतात. शैलेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार या तलावात नैन, चाइना फिश, सीलन, ग्रास कटर आणि सिल्वर हे मासे आहेत. मासेमारी आणि फळं विकून जवळपास २० ते २५ लाख रुपये कमावता येतात, त्यात ५ ते ७ लाखांची बचत करता येते.

पुढे त्यांनी सांगितले की, ''एका वर्षापूर्वी गुगलकडून प्रशस्तीपत्रक देण्यात आलं होतं. त्यातून या कामाचे कौतुक करण्यात आले होते तसंच फळं आणि फुल झाडांच्या सुंदरतेची प्रशंसा करण्यात आली होती. '' (Image Credit- Aajtak)