बिस्किट बनवणारी कंपनी पारलेचे मालक कोण आहेत, ब्रँडचं नाव पारले पडलं तरी कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:56 IST2026-01-07T13:30:24+5:302026-01-07T14:56:27+5:30

Parle G Interesting Facts : आपणही अनेकदा ही बिस्किटं खाल्ली असतील. पण या कंपनीचे मालक कोण किंवा पारले हे नाव कसं पडलं? हे आजही अनेकांना माहीत नसेल. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Parle G Interesting Facts : पारले हे केवळ बिस्किट नाही तर अनेकांसाठी एक इमोशन आहेत. पूर्वी बिस्किट म्हणजे फक्त पारले असं काय ते गणित होतं. फार नंतर बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांची बिस्किटं आलीत. पण पारलेची जागा कुणीही घेऊ शकलं नाही.

आजही देशात कितीतरी लोक पारले बिस्किट सकाळी चहात बुडवून खात असतील. इतकंच काय तर पारले बिस्किटांच्या बॉक्सवरील चिमुकल्याला फोटोही नेहमीच चर्चेत असतो. आपणही अनेकदा ही बिस्किटं खाल्ली असतील. पण या कंपनीचे मालक कोण किंवा पारले हे नाव कसं पडलं? हे आजही अनेकांना माहीत नसेल. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

देशभरात आपल्या टेस्टी बिस्किटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पारले प्रॉडक्ट्सचा मालकी हक्क हा चौहान परिवाराकडे आहे. महत्वाची बाब म्हणजे ही काही पब्लिकली लिस्टेड किंवा सरकारी कंपनी नाही. ही एक प्रायव्हेट इंडियन इंटरप्रायजेस आहे. आपल्याला विश्वास बसणार नाही, या कंपनीची स्थापना १९२९ मध्ये मोहनलाल दयाल चौहान यांनी केली होती. आता ही कंपनी त्यांच्या वंशजांकडून चालवली जात आहे. सध्या पारले कंपनीची जबाबदारी विजय चौहान यांच्या हाती आहे. विजय चौहान हे कंपनीमध्ये अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळतात. सोबतच शरद चौहान आणि राज चौहान हे देखील कंपनी सांभाळतात.

अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात येतं की, पारले कंपनीची सुरूवातच राष्ट्रवादातून झाली होती. कंपनीचा स्थापना करणारे मोहनलाल दयाल चौहान हे आधी मुंबईत रेशमचा व्यापार करत होते. १९२० मधील स्वदेशी आंदोलनातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी ब्रिटिश खाद्य उत्पादनांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारतात अनेक ब्रिटिश खाद्य उत्पादने विकली जात होती. त्या काळात बिस्किट केवळ श्रीमंत लोकांसाठी स्वस्त होते.

पण बिस्किट कसे बनवायचे हे शिकण्याची सोय भारतात नव्हती. त्यासाठी चौहान हे जर्मनीला गेले. त्यांनी जवळपास ६० हजार रूपयांची मशिनरी भारतात आणली. १९२८-२९ मध्ये त्यांनी मुंबईच्या विले-पार्ले भागात परिवारातील १२ सदस्यांसोबत एक छोटी फॅक्टरी सुरू केली. त्यामुळे या कंपनीचं नावही या ठिकाणावरून पडलं.

आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण पारले कंपनीचं पहिलं प्रॉडक्ट बिस्किट नव्हतं. बिस्किट कंपनीने जवळपास १ दशकानंतर म्हणजे १९३८-३९ मध्ये बनवले. तेव्हा आधी पारले ग्लूको लॉन्च करण्यात आले होते. पुढे पारले ग्लूको ब्रॅन्ड पारले-जी मध्ये बदलला. जो पुढे जाऊन २०११ मध्ये जगात सगळ्यात विकला जाणारा बिस्किट ब्रॅन्ड बनला. पारले-जी मधील जी हा आधी ग्लूकोमधील जी होता. पण नंतर पुढे हा 'जी' जीनिअस म्हणून दर्शवण्यात आला. म्हणजे या जी चे दोन मुख्य अर्थ आहेत एक म्हणजे ग्लूकोज आणि दुसरा म्हणजे जीनिअस.

मुळात पारले-जी बिस्किटाच्या पॅकेटवरील मुलगी खरी व्यक्ती नाही. १९६० मध्ये मगन लाल दहिया यांनी हा काल्पनिक फोटो रेखाटला होता. जो लहान मुलं आणि मातांना आकर्षित करण्यासाठी बनवण्यात आला होता. त्यामुळे हा फोटो सुधा मूर्ति किंवा नीरू देशपांडे यांचा आहे, असं वाटत असेल तर ते चूक आहे.