जगातील एकुलतं एक असं बेट जिथे पुरूषांच्या येण्यावर आहे बंदी, कारणही आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:47 IST2026-02-12T15:08:15+5:302026-02-12T15:47:47+5:30
Island Where Men Ban : हे बेट काही एखादं रहस्यमयी किंवा सरकारी बेट नाही. हे एक खाजगी वेलनेस रिट्रीट आहे, जे खासकरून महिलांसाठी तयार केलं जातं.

Island Where Men Ban : जगभरातील वेगवेगळे बेट आपल्या वेगळेपणासाठी चर्चेत असतात. स्वच्छ बीच, हिरवी झाडी असलेले अनेक बेट जगात आहेत. जिथे जाऊन लोक निसर्गाचा भरपूर आनंद घेतात. समुद्राच्या मधोमध असंच एक बेट आहे, जिथे आपण सहज पोहोचू शकतो. पण तेथील दारं सगळ्यांसाठीच उघडी नसतात. या बेटावर पुरूषांना येण्यास पूर्णपणे बंदी आहे. या बेटावर असा नियम का आहे हे जाणून घेऊया.

निसर्गाचा खजिना असलेलं हे बेट फिनलँडच्या दक्षिण तटाच्या बाल्टिक समुद्रात आहे. या खास बेटाचं नाव आहे सुपरशी आयलँड. साधारण ८.४ एकरात पसरलेलं हे खाजगी बेट घनदाट झाडी आणि शांत समुद्राने वेढलेलं आहे.

हे बेट काही एखादं रहस्यमयी किंवा सरकारी बेट नाही. हे एक खाजगी वेलनेस रिट्रीट आहे, जे खासकरून महिलांसाठी तयार केलं जातं.

या बेटावर वेलनेस रिट्रीटची सुरूवात टेक इंडस्ट्रीतील माजी सीईओ क्रिस्टिना रोथने केली होती. हे ठिकाण बनवण्याचा त्यांचा उद्देश होता, जिथे महिला कोणत्याही सामाजिक दबावाशिवाय स्वत:वर लक्ष देऊ शकतील. इथे योगा, मेडिटेशन, हेल्थ सेशन आणि निसर्गाच्या सानिध्यात आराम करण्याच्या सुविधा आहेत.

क्रिस्टिना रोथचं मत होतं की, अनेक महिला सुट्ट्यांमध्ये सुद्धा आपला लूक, वागणं किंवा सामाजिक अपेक्षांबाबत सजग असतात. त्यामुळे त्यांनी महिलांसाठी अशी स्पेस तयार केली, जिथे महिला पूर्णपणे सहज होऊन वेळ घालवू शकतील. त्यामुळे या बेटावर पुरूषांना येण्यास बंदी आहे.

महत्वाची बाब म्हणजे हे काही एखादं मोठं रिसॉर्ट नाही. इथे एकावेळी केवळ जवळपास ८ महिला थांबू शकतात. वेगवेगळ्या देशातील या महिला असतात. अट ही असते की, त्यांनी इथे आपलं पद, ओळख आणि स्टेटसपेक्षा स्वत:च्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत करावं.

ही खाजगी संपत्ती असल्याने मालकाला आपले नियम ठरवण्याचा अधिकार आहे. पुरूषांच्या बंदीचा हा काही सरकारी नियम नाही. ही एक प्रायव्हेट रिट्रीट पॉलिसी आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागात महिलांसाठी विशेष क्लब किंवा ठिकाणं आधीच आहे. सुपरशी आयलँड देखील त्यांपैकी एक आहे.

















