इराण-इस्रायल युद्धाने जग हादरलं, पण 'या' देशात कधीच वाजला नाही सायरन; काय आहे याचं गुपित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:08 IST2026-03-17T15:05:45+5:302026-03-17T15:08:41+5:30
एक असा देश आहे ज्याने शतकानुशतके युद्धाचा 'य' देखील अनुभवलेला नाही.

आज इराण आणि इस्रायलमधील मिसाईल हल्ल्यांमुळे संपूर्ण मानवता दहशतीखाली आहे. रशिया-युक्रेन असो वा मध्य-पूर्वेतील संघर्ष, आधुनिक जगाचा नकाशा रक्ताने माखलेला दिसत असतानाच, एक असा देश आहे ज्याने शतकानुशतके युद्धाचा 'य' देखील अनुभवलेला नाही.

इटलीच्या कुशीत वसलेला 'सॅन मरीनो' हा छोटासा देश आजच्या अशांत काळात जगासाठी एक जिवंत चमत्कार ठरला आहे. अधिकृतपणे 'मोस्ट सीरीन रिपब्लिक ऑफ सॅन मरीनो' असं नाव असलेला हा देश जगातील सर्वात जुन्या प्रजासत्ताकांपैकी एक आहे.

केवळ ३४ हजार लोकसंख्या असलेल्या या देशाने आंतरराष्ट्रीय विवादांपासून स्वतःला इतकं लांब ठेवलं आहे की, आज जिथे इराण-इस्रायल वर्चस्वाच्या लढाईत संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे, तिथे सॅन मरीनो 'तटस्थतेचा' आदर्श घालून देत आहे.

सॅन मरीनोची स्थापना चौथ्या शतकात झाली. तेव्हापासून आजपर्यंत या देशाने कोणत्याही मोठ्या युद्धाचा सामना केलेला नाही. जेव्हा नेपोलियन संपूर्ण युरोप जिंकण्यासाठी निघाला होता किंवा जेव्हा हिटलरच्या सैन्याने जगात दहशत माजवली होती, तेव्हाही सॅन मरीनो आपल्या डोंगराळ भौगोलिक रचनेमुळे आणि मुत्सद्दी धोरणांमुळे सुरक्षित राहिला. कोणत्याही गटाचा हिस्सा न बनता, केवळ शांतता करारांना प्राधान्य देण्याची या देशाची परंपरा आजही कायम आहे.

आज अनेक देश आपल्या जीडीपीचा मोठा हिस्सा शस्त्रास्त्रे खरेदीवर खर्च करतात. मात्र, सॅन मरीनोने आपली शक्ती पर्यटनात लावली आहे. या देशाची निम्म्याहून अधिक कमाई पर्यटनातून होते. आज जेव्हा इस्रायल आणि इराणच्या आकाशातून मृत्यूचा वर्षाव होत आहे, तेव्हा सॅन मरीनोच्या मध्ययुगीन वास्तुकलेने नटलेल्या रस्त्यांवर पर्यटक निवांतपणे फिरताना दिसतात.

माउंट टिटानोच्या शिखरांवर वसलेला हा देश सामरिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित मानला जातो. डोंगराळ भागामुळे परकीय सैन्याला इथे पोहोचणं नेहमीच कठीण राहिलं आहे. जुन्या काळातील साम्राज्यवाद असो किंवा आजचं छद्म युद्ध, सॅन मरीनोने आपली स्वायत्तता जपली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील उलथापालथीतून स्वतःला कसं वाचवावं आणि विकास कसा करावा, याचा वस्तुपाठच सॅन मरीनोने जगासमोर ठेवला आहे.

















