जबरदस्त! कुणीतरी पंख कापल्याने पोपटाला उडताच येत नव्हतं, डॉक्टरने 'अशी' दिली त्याला उडण्याची नवी उमेद!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 10:14 AM2020-02-27T10:14:31+5:302020-02-27T11:05:05+5:30

पंख पक्ष्यांचा जीव असतात हे तुम्हाला माहीत आहेच. मग जरा विचार करा की, त्यांचे पंखच कापले गेले तर त्यांची कशी घुमसट होत असेल. जगभरात असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या शौकासाठी मुक्या जनावरांना पिंजऱ्यात कैद करून ठेवतात.

काही तर पक्ष्यांचे पंखही कापतात. अशीच एक घटना ऑस्ट्रेलियात घडली. इथे Wei Wei नावाच्या एका पोपटाचे पंख कापण्यात आले होते. मात्र, एका महिला डॉक्टरने कमाल करत त्या पोपटाला नवं जीवन दिलंय.

या डॉक्टरने पोपटाला नवे पंख दिले. त्यामुळे हा पोपट पुन्हा एकदा आकाशात झेप घेऊ शकत आहे.

पोपटाचा मालक त्याला जनरल चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. तिथे ३१ वर्षीय वेटर्नरी डॉक्टर कॅथरीन अपुलीने सांगितले की, पोपटाचे पंख फार जास्त कापले गेले आहेत.

पंख कापल्यावर उडण्याचा प्रयत्न करत असताना पोपट जखमी झाला होता. नंतर डॉक्टरने दान मिळालेल्या पंखापासून प्रोस्थेटिक पंख तयार केले. यासाठी तिने गोंद आणि टूथपिक्सचा वापर केला.

जेव्हा Wei Wei झोपेत होता तेव्हा त्याचे पंख ट्रान्सप्लांट करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान त्याला काही वेदना जाणवल्या नाहीत. काही तासातच ही ट्रान्सप्लांटची प्रक्रिया झाली. त्यानंतर तो स्वत:च्या पायावर उभा झाला.

आधी पक्ष्यांना पंख लावण्याची प्रक्रिया फार किचकट होती. यात पक्ष्यांना फार जास्त त्रास होत होता. पण आता ग्लू बेस्ड टेक्निकमुळे काही तासातच ही प्रक्रिया होते.

रिपोर्ट्सनुसार, ट्रान्सप्लांटनंतर पोपट एक तासभर आकाशात उडत होता. नंतर सुरक्षित जमिनीवरही आला.