शास्त्रज्ञ पहिल्यांदाच उतरले लाखो वर्षे जुन्या 'नरकाच्या खड्ड्यात', आढळल्या 'या' विचित्र गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 03:58 PM2021-09-24T15:58:21+5:302021-09-24T16:02:59+5:30

येमेनमधील स्थानिक नागरिक या खड्ड्याला 'नरकाचा रास्ता' म्हणतात.

येमेनच्या वाळवंटात एक गूढ 'खड्डा' आहे. बऱ्याच काळापासून हा खड्डा सर्वांसाठीच आकर्षणाचा विषय राहिली आहे. येमेनमधील बारहूत येथे असलेल्या या खड्ड्याला 'नरकाचा खड्डा' म्हटले जाते. आतापर्यंत या खड्ड्यात कुणीच उतरले नव्हते, पण आता येमेनमधील 8 शास्त्रज्ञांच्या टीमने आत उतरुन या रहस्यमय खड्ड्याचे परीक्षण केलं आहे.

या खड्ड्यात भुतांना कैद केलं जायचं, आताही यात जिन आणि भूत राहतात, असं येमेनमधी स्थानिक लोक मानतात. स्थानिक नागरिक या विहिरीबद्दल बोलायलाही घाबरतात. पण, शास्त्रज्ञांना या विहिरीत भूतासारख्या काही गोष्टी आढळल्या नाही. पण, साप आणि गुहेतील मोती जरुर सापडले आहेत.

येमेनमध्ये असलेला हा विशाल आकाराचा खड्डा 30 मीटर रुंद आणि 100-250 मीटर खोल आहे. येमेनचे अधिकारी बराच वेळ विचार करत राहिले की या प्रचंड खड्ड्याच्या तळाशी काय आहे. ओमान गुहा एक्सप्लोरेशन टीम या खड्ड्यात उतरली आणि त्यांना यात मोठ्या प्रमाणात साप आढळले. याशिवाय काही मृत प्राणीही होते.

येमेनमधील जर्मन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक मोहम्मद अल किंदी यांनी सांगितले की या खड्ड्यात साप आहेत. परंतु जर तुम्ही त्यांना त्रास दिला नाही तर ते काहीही करत नाहीत. तसेच, या खड्ड्यातील भितींवर काही आकृत्याही दिसून आल्यात. सध्या याचा अधिक तपास केला जात आहे.

माहराच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि खनिज संसाधना प्राधिकरणाचे महासंचालक सालाह बभैर यांनी यापूर्वी सांगितले होते की खड्डा खूप खोल आहे आणि त्याच्या तळाशी ऑक्सिजन आणि वायुवीजन खूप कमी आहे. खड्याच्या 50 मीटर खाली गेला असता काहीतरी विचीत्र जाणीव झाली आणि घाण वासही आला.

ते पुढे म्हणाले की, या खड्ड्याच्या तळासी प्रकाश येत नसल्यामुळे स्पष्ट काही दिसू शकले नाही. खड्डा लाखो वर्षे जुना आहे आणि त्यासाठी अधिक अभ्यास, संशोधनाची गरज आहे. सालाहने याचे वर्णन 'रहस्यमय परिस्थिती' असे केले आहे