पंख नसूनही साप हवेत उडतात कसे? अखेर वैज्ञानिकांनी मिळवलं या प्रश्नाचं उत्तर....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 11:36 AM2020-07-03T11:36:34+5:302020-07-03T12:01:00+5:30

पॅराडाइस ट्री स्नेक किंवा क्रिसोपेलिया पाराडिसी प्रजातीचा हा साप झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडतो. अनेकदा तर तो उडून जमिनीवरही येतो.

सामान्यपणे उडणारे साप फार कमी आढळतात. हैराण करणारी बाब ही आहे की, फार जास्त विषारी नसूनही या सापांबाबत भीती फार जास्त आहे. पण या सापांना पंख नसूनही उडतात कसे? असा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो. वैज्ञानिकांनी अखेर या प्रश्नाचं उत्तर शोधलं आहे. ताज्या रिसर्चनुसार, हे साप एका खास हालचालीच्या माध्यमातून उडू शकतात.

पॅराडाइस ट्री स्नेक किंवा क्रिसोपेलिया पाराडिसी प्रजातीचा हा साप झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडतो. अनेकदा तर तो उडून जमिनीवरही येतो.

हा साप एका खास पद्धतीने हलत हवेत उडतो. तो हवेत हालचालीने 'S' अक्षर करतो. या प्रक्रियेला अनड्यूलेशन म्हटलं जातं. ही हालचालच त्याला उडणारा साप बनवतो. त्यामुळेच या सापाला ग्लायडिंग स्नेक असंही म्हणतात.

वैज्ञानिकांनी या प्रजातीच्या सात सापांचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी सापांच्या हालचालींना हायस्पीड कॅमेरात रेकॉर्ड केलं. हा रिसर्च 'अनड्यूलेशन एनएबल्स ग्लायडिंग इन फ्लाईंग स्नेक्स' या नावाने नेचर फिजिक्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

या रिसर्चमधील एक वैज्ञानिक आणि व्हर्जिनियामध्ये बायोकेमिकल इंजिनिअर अॅन्ड मॅकेनिक्सचे प्राध्यापक जॅक सोचा यांनी सांगितले की, आपल्या शरीराला सरळ करणं या उडणाऱ्या सापांच्या उड्डाणाचा भाग आहे.

पण ते तरंगांसारख्या हालचालीही करतात. ते म्हणाले की, 'असं वाटतं की, साप हवेत स्वीमिंग करतात आणि ते जेव्हा तरंगतात तेव्हा अनड्यूलेशन प्रक्रिया होते.

या रिसर्चनुसार साप दोन प्रकारच्या वेगवेगळ्या हालचाली करतात. ते एक मोठी लहर तयार करतात आणि त्यासोबतच ते एक छोटी लहर तयार करतात. दोन्ही काम डोक्यापासून ते शेपटीपर्यंत एका समन्वयासोबत होतात.

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे मेकॅनिकल इंजिनिअर इसाक येटोन यांनी सांगितले की, 'ही प्रक्रिया फार वेगाने होते आणि डोळ्यांनी हे बघणं फार कठिण असतं. त्यामुळे आम्ही हायस्पीड मोशन पकडण्यासाठी हायस्पीड कॅमेराची मदत घेतली'.

वैज्ञानिकांनी हेही जाणून घेतलं की, या सापांच्या शरीराचा मागचा भाग एकप्रकारे वरखाली होणारी हालचाल करतो. ते म्हणाले की, विना अनड्यूलेशन त्यांचं उडणं अस्थिर होऊ शकतं, ज्यामुळे ते खाली पडू शकतात. येटोन म्हणाले की, सामान्यपणे साप पुडे सरकरण्यासाठी अनड्यूलेशन करतात. पण उडणारे साप खाली पडू नये म्हणून असं करतात.

क्रिसोपेलिया प्रजातीच्या सापांना सामान्यपणे उडणारे साप म्हटलं जातं. दक्षिणपूर्व चीन आणि फिलिपिन्समध्ये हे साप आढळतात. या सापांचं विष जिवघेणं मानलं जात नाही. म्हणजे हे साप विषारी सापांच्या श्रेणीत येत नाहीत. हे साप साधरण पोट भरण्यासठी पाल, वटवाघूळ, पक्षी, किटक खातात.

यातील ज्या खास प्रजातींचा अभ्यास करण्यात आला त्यांना पॅराडाइस ट्री स्नेक म्हणतात. ही उडणाऱ्या सापांची सर्वात छोटी प्रजाती आहे. यांची लांबी साधारण 3 फूट असते. काळ्या रंगाच्या या सापांवर हिरव्या रेषा असतात.