आधुनिक सिंचन प्रणाली, कालवे, पाण्याच्या टाक्या; सौदी अरेबियात सापडले 8000 वर्षे जुने शहर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 07:25 PM2022-08-01T19:25:29+5:302022-08-01T19:28:14+5:30

सौदी अरेबियामध्ये उत्खनन आणि सर्वेक्षणादरम्यान एक प्राचीन मंदिर, शिलालेख आणि विविध कलाकृती सापडल्या आहेत.

रियाद: वाळवंटी देश असलेल्या सौदी अरेबियामध्ये उत्खनन आणि सर्वेक्षणादरम्यान एक पुरातन दगडी मंदिर आणि वेदी सापडल्या माहिती समोर आली आहे. या ठिकाणी मंदिरासह 8,000 वर्षे जुन्या मानवी वसाहतींचे अवशेषही सापडले आहेत. याशिवाय या ठिकाणी वेगवेगळ्या काळातील 2 हजार 807 कबरीदेखील आढळल्या. तसेच, इथल्या दगडांवरील कलाकृती आणि शिलालेखांमधून एका व्यक्तीची कथा सांगितली गेली आहे.

धार्मिक शिलालेख समोर आले- सौदी अरेबियात सापडलेल्या या पुरातन मंदिर आणि मानवी वसाहतीमध्ये काही धार्मिक शिलालेखही सापडले आहेत. एकेकाळी किंडा राज्याची राजधानी असलेल्या अल-फाओमध्ये हा शोध लागला आहे. अल-फाओ (Al-Faw), Al-Rub’ Al-Khali (द एंपटी क्वाटर) नावाच्या वाळवंटाच्या काठावर वसलेले शहर होते. हे वाडी अल-दवासीरच्या दक्षिणेस 100 किमी अंतरावर आहे.

अनेक गोष्टी आढळल्या- saudigazette.com.sa नुसार, सौदी अरेबिया हेरिटेज कमिशनच्या वतीने एक बहुराष्ट्रीय टीम अल-फाओ येथे सर्वेक्षण करण्यासाठी गेली होती. तिथे खोलवर उत्खनन आणि सर्वेक्षण केले. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या. येथे सापडलेल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे दगडी मंदिर आणि वेदीचे काही भाग. असे मानले जाते की अल-फाओचे लोक येथे धार्मिक विधी करत असत. अल-फाओच्या पूर्वेकडील दगडी मंदिर तुवैक पर्वताच्या एका बाजूला आहे, ज्याला खशेम कारियाह म्हणतात.

हजारो कबरी सापडल्या- याशिवाय 8 हजार वर्षांच्या निओलिथिक काळातील मानवी वसाहतींचे अवशेष येथे सापडले आहेत. याशिवाय विविध कालखंडातील 2 हजार 807 कबरीही या ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत. अल-फाओमध्ये जमिनीखालूनही अनेक धार्मिक शिलालेख सापडले आहेत. त्यामुळे याठिकाणी असलेल्या लोकांच्या धार्मिक आकलनाबाबतही अनेक महत्त्वाची माहिती प्राप्त झाली आहे. अल-फाओच्या भौगोलिक रचनेबाबतही अनेक महत्त्वाच्या गोष्टी या सर्वेक्षणातून समोर आल्या आहेत.

पाणी साठवण्याचे तंत्र- या अभ्यासातून अल-फाओची जटिल सिंचन प्रणाली देखील उघड झाली. कालवे, पाण्याच्या टाक्यांव्यतिरिक्त, स्थानिक लोकांनी पावसाचे पाणी शेतात नेण्यासाठी शेकडो खड्डे खोदले होते. या शोधांद्वारे, जगातील सर्वात कठीण वाळवंटात लोक पावसाचे पाणी कसे वाचवायचे हे कळते. तुवाक पर्वताच्या दगडांवर बनवलेल्या कलाकृती आणि शिलालेख मढेकर बिन मुनीम नावाच्या माणसाची कथा सांगतात. याशिवाय शिकार, प्रवास आणि युद्धाची माहितीही दगडी कलाकृतींद्वारे मिळते.