एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 13:47 IST2025-10-30T13:38:07+5:302025-10-30T13:47:07+5:30

कधी कधी सामान्य जीवन जगताना अशा छोट्या घटना घडतात ज्यामुळे माणसाचं नशीब बदलू शकते. उत्तर प्रदेशातील अलीगड येथील रिक्षाचालक शकीलसोबत असेच काही घडले. शकीलचा प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ भावनेने त्याचे आयुष्य बदलून गेले.

एका व्हायरल व्हिडिओमुळे शकील रातोरात सेलिब्रिटी बनला, या व्हिडिओने शकीलला इतके प्रसिद्ध केले की एका माजी मुख्यमंत्र्‍यांनी त्याला भेटायला बोलावले. त्यानंतर त्याच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झाले.

अलीगडमधील रिक्षाचालक शकील एका व्हिडिओमुळे चांगलेच चर्चेत आले होते. या व्हिडिओत शकील हे रस्त्याशेजारी उभ्या असणाऱ्या वाहनावरील समाजवादी पक्षाचा झेंडा पाहतात, या झेंड्यावर अखिलेश यादव यांचा फोटो असतो. हा फोटो पाहून शकील भावूक होतात, त्यानंतर ते फोटोकडून निरखून पाहतात त्यावर Kiss करतात.

ही घटना पाहणारा व्यक्ती ते सगळे कॅमेऱ्यात कैद करतो. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. व्हिडिओ इतका पसरत जातो की, तो अखिलेश यादव यांच्याकडेही पोहचतो. त्यानंतर सपा नेते अज्जू इश्हाक या रिक्षाचालकाची मदत करण्याचं ठरवतात.

अखिलेश यादव यांनी शकील यांना दिल्लीला बोलावले. त्यानंतर त्यांना ५० हजार रूपये भेट दिली त्याशिवाय दिल्लीतील ५ स्टार हॉटेलमध्ये शकील २ दिवस थांबले होते. शकील यांनी आयुष्यात पहिल्यांदाच लग्झरी हॉटेलमध्ये राहण्याचा अनुभव घेतला. ज्या डिशची नावे माहिती नव्हती त्याचा स्वादही त्यांनी घेतला.

त्यानंतर अखिलेश यादव यांच्या भेटीनंतर शकील पुन्हा अलीगडला आले. तिथे अखिलेश यांनी या रिक्षा चालकाला ई रिक्षा भेट दिली. त्यामुळे शकील आता भाड्याने रिक्षा न घेता स्वत:ची ई रिक्षा चालवतो. दिवसेंदिवस त्याची कमाईही चांगली होऊ लागली. सध्या अलीगडमध्ये शकील सेलिब्रिटी बनला आहे.

याबाबत शकील म्हणतात की, अखिलेश यादव यांचा फोटो पाहून त्यांच्याशी बोलतानाचा माझा व्हिडिओ कुणी बनवत असेल याचा मी विचारही केला नाही. त्या क्षणामुळे माझे पुढचे आयुष्य बदलले. आता मी रस्त्यावर कुठे चालत जात असेल तर अलीगडमधील लोक मला ओळखतात असं त्यांनी सांगितले.

अलीगडच्या जीवनगड येथे शकील राहतात. ते खूप सामान्य घरातून आलेले आहेत. ४० वर्षापूर्वी शकील त्यांचे वडील नजीर यांच्यासोबत अलीगड येथे राहायला आले होते. शकील यांना ४ भाऊ आणि ६ बहिणी आहेत. सर्व बहि‍णींचे लग्न झाले आहे.

शकील आणि त्यांचे २ भाऊ एकाच खोलीत कुटुंबासह राहतात. शकील कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवतात. एक भाऊ कारखान्यात मजुरीचे काम करतो. शकील यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली. त्यानंतर संपूर्ण परिसरात शकील यांचीच चर्चा सुरू होती.

शकील यांना ३ मुले आणि १ मुलगी आहे. मुलेही मजुरी करायचे. मुलगी शिक्षण घेत आहे. जेव्हा अखिलेश यादव यांच्याकडून ई रिक्षा मिळाली, तेव्हापासून सकाळी मुलगा रिक्षा चालवण्याचं काम करतो, तर संध्याकाळी शकील स्वत: रिक्षा चालवातत. त्यातून कुटुंबाची कमाई वाढली आहे.