भारतातील अशी ठिकाणे जिथे फिरायला गेल्यास तुम्ही रातोरात बनू शकता करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 03:50 PM2021-07-27T15:50:23+5:302021-07-27T15:56:28+5:30

Treasure in india: भारतामध्ये अनेक अशा जागा आहेत जिथे अफाट खजिना दडलेला आहे. मात्र आतापर्यंत कुणालाही हा खजिना शोधता आलेला नाही. तसेच ज्या खजिन्याचा शोध लागला आहे त्याच्यापर्यंत पोहोचणे सोपे नाही. या खजिन्यांमध्ये एवढी संपत्ती आहे जिच्या माध्यमातून तुम्ही रातोरात करोडपती बनू शकता.

कधीकाळी सोन्याचा धूर येणार देश म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो अशा आपल्या भारतामध्ये आजही अनेक अशा जागा आहेत जिथे अफाट संपत्ती असल्याचा दावा केला जातो. ही संपत्ती मंदिरे, किल्ल्यांचे अवशेष अशा ठिकाणी आहे. शेकडो वर्षांपूर्वी लपवण्यात आलेल्या या संपत्तीवरून तुम्ही त्याकाळी भारत हा किती संपन्न देश होता याची कल्पना करू शकता. काही ठिकाणी तर एवढी संपत्ती आहे की जी मिळाल्यास तुम्ही रातोरात अब्जाधीश होऊ शकता. आज आपण जाणून घेऊयात भारतातील अशाच पाच जागांविषयी.

नावावरूनच इथे सोन्याचे भंडार असल्याचे समजते. या बिहारमधील राजगीर येथील दोन गुहा आहेत. गौतम बुद्धांनी याच ठिकाणी मगध साम्राज्याचे राजे बिंबिसार यांना उपदेश केला होता. येथीलच दोन गुहांमध्ये सोने लपवून ठेवले आहे, असे सांगितले जाते. तसेच हा खजिना एका गुप्तद्वारामागे अत्यंत सुरक्षित पद्धतीने लपवण्यात आला आहे. जर तुम्ही गुहेवर कोरण्यात आलेली लिपी समजू शकलात तर तुम्हाला हे गुप्तद्वार कसे उघडायचे याची माहिती मिळू शकते.

तिरुवनंतपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिर हे भारतातील मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. येथे अनेक अब्जाधीशांपेक्षा अधिक संपत्ती आहे. २०११ मध्ये कोर्टाच्या आदेशानुसार येथील तळघर उघडले होते. तेव्हा मूर्ती, मुकूट, दागदागिने यांसह अनेक अमूल्या रत्ने सापडली होती. येथील तळघरात असलेल्या मालमत्तेची एकूण किंमत २२ अब्ज रुपये असल्यांचा अंदाज आहे. कोर्टाने येथील दुसरे तळघरही उघडण्याचे आदेश दिले होते. मात्र येथील खजिन्याचे रक्षण हे नागदेवता करतात, तसेच तळघर उघडल्यास जगात विध्वंस होईल असे सांगुन पुजाऱ्यांनी तळघर उघडण्यास विरोध केला होता.

हैदराबादचे अखेरचे निजाम मीर उस्मान अली यांचा उल्लेख फोर्ब्स मासिकाने २१०.८ अब्ज डॉलर एवढी रक्कम बाळगणारा जगातील पाचवा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असा केला होता. तर १९३७ मध्ये टाइम मासिकाने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांच्या उल्लेख केला. २०११ मध्ये जेव्हा मीर उस्मान हे हैदराबादचे निजाम बनले तेव्हा त्यांच्या वडिलांच्या चैनीमुळे राज्याचा खजिना रिकामी झाला होता. मात्र मीर उस्मान यांनी आपल्या सत्ताकाळात संपत्ती खूप वाढवली. मीर उस्मान अली यांची संपूर्ण संपत्ती ही हैदराबादमधील किंग कोठीमध्ये लपवून ठेवली आहे, असे सांगण्यात येते.

आंध्र प्रदेशमधील कृष्णा नदीला जगातील सर्वात किमती आणि प्रसिद्ध अशा कोहिनूर हिऱ्यासाठी ओळखले जाते. हिंदू या नदीला पवित्र मानतात. ही नदी म्हणजे जगातील चौथी सर्वात मोठी हिऱ्यांची खाण आहे, असे मानले जाते. ही नदी चार राज्यांसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. एकेकाळी ही नदी जगभरातील हिऱ्यांचा मुख्य स्रोत होती. जगातील दर १० मधील ७ हिरे हे या नदीमधून मिळतात.

राजस्थानमध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. यामधील प्रत्येक किल्ल्याचा आपला असा इतिहास आहे. जयगडचा किल्लासुद्धा यापैकीच एक आहे. तसेच इथेही गुप्त खजिना लपवलेला आहे, असे सांगितले जाते. मानसिंह-१ हे जयपूरचे राजे आणि अकबराच्या सैन्याचे सेनापती होते. असे म्हणतात की, अफगाण युद्धातील विजयानंतर मानसिंग-१ ने अकबराला लुटीचा हिस्सा दिला नाही व तो खजिना याच किल्ल्यामध्ये लपवला होता. असे म्हणतात की इंदिरा गांधी यांनीही या खजिन्याच्या शोध घेण्याचे आदेश दिले होते. मात्र याबाबत कुठलीच ठोस माहिती कुणालाही नाही. तरीही अद्याप हा खजिना किल्ल्यात कुठेतरी दबलेला असावा, असे सांगितले जाते.