PHOTO : एका विशाल डोंगराखाली वसलेलं एक अनोखं शहर, इथे राहणाऱ्या ३ हजार लोकांचं जगणं वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:58 IST2026-01-30T13:44:26+5:302026-01-30T14:58:48+5:30

Setenil de las Bodegas : या शहरात चालताना वेगळ्याच विश्वात पायी फिरत आहोत, असा अनुभव येतो. त्याची अनोखी रचना आणि नैसर्गिक संरक्षण यामुळे हे ठिकाण प्रत्येक प्रवाशासाठी खास बनलं आहे.

जगातील कितीतरी शहरं आपल्या वेगळेपणा नेहमीच चर्चेत असतात. कुठला निसर्ग सर्वांचं लक्ष वेधून घेतो तर कुठला वाळवंट, तर कुठला समुद्र.... जगात अनेक शहरं त्यांच्या वेगळ्या रचनेमुळे आणि इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत. मात्र स्पेनमधील हे छोटेसं शहर सर्वांपेक्षा वेगळे ठरते. सुमारे ५०० वर्षांपूर्वी एका विशाल दगडाखाली वसवलेले हे शहर आजही तिथेच नांदत आहे.

या अनोख्या शहरात साधारण ३ हजार लोक राहतात. घरं, रस्ते आणि अरुंद गल्ल्या थेट दगडांच्या भेगांमध्येच घडवलेल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात नैसर्गिक गारवा आणि हिवाळ्यात उब मिळते. या शहरात चालताना वेगळ्याच विश्वात पायी फिरत आहोत, असा अनुभव येतो. त्याची अनोखी रचना आणि नैसर्गिक संरक्षण यामुळे हे ठिकाण प्रत्येक प्रवाशासाठी खास बनलं आहे.

मिरर वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, स्पेनच्या कॅडिज प्रांतात Setenil de las Bodegas नावाचं हे छोटं शहर आहे. संपूर्ण वस्ती एका विशाल डोंगराखाली किंवा छोट्या टेकडीखाली उभारलेली आहे. काही रस्ते असे आहेत जिथे वर आकाशच दिसत नाही, फक्त दगडी छत नजरेस पडतं.

अनेक घरांची छतं आणि रस्ते नैसर्गिक दगडापासूनच तयार झालेले आहेत. ही नैसर्गिक रचना घरांना उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवते. याच वैशिष्ट्यामुळे हे शहर वास्तुकलेचा एक अनोखा नमुना मानलं जातं. येथे सुमारे ३ हजार लोक राहतात आणि पायी फिरण्यासाठी हे शहर अतिशय आकर्षक आहे.

Setenil de las Bodegas चा इतिहास खूपच मनोरंजक आहे. पूर्वी या भागावर मुस्लिमांचं शासन होतं. हा किल्ला जिंकण्यासाठी ख्रिश्चन शासकांना तब्बल सात वेळा प्रयत्न करावे लागले. सात वेळा अपयश आल्यानंतरच हा किल्ला त्यांच्या ताब्यात आला. शहराचं नावही याच घटनेवरून ठेवण्यात आले आहे.

“Setenil” हा शब्द लॅटिनमधील “Septem Nihil” पासून आला असून त्याचा अर्थ ‘सात वेळा अपयश’ असा होतो. नावाचा दुसरा भाग “de las Bodegas” म्हणजे वायनरी. पूर्वी येथे मोठ्या प्रमाणावर वाइन उद्योग होता. आजही बदाम आणि ऑलिव्ह तेल हे येथील प्रसिद्ध स्थानिक उत्पादने आहेत.

आजही Setenil de las Bodegas आपल्या वेगळ्या इतिहासामुळे आणि अद्भुत वास्तुकलेमुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. येथील गल्ल्या आणि बाजारांमधून फिरताना जणू काळाच्या चक्रात मागे गेल्यासारखे वाटते. स्थानिक लोक आजही पारंपरिक जीवनशैली जपून राहतात.

आसपासच्या शेतीतून वाइन, ऑलिव्ह तेल आणि बदामांची निर्मिती केली जाते. हे शहर केवळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे नाही, तर पायी फिरण्याचा आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा एक अद्वितीय अनुभव देणारे ठिकाण आहे.