'आकाशातून काढा पैसे...' या ठिकाणी आहे जगातील सर्वात उंच ATM; कॅश काढण्यासाठी लागतात रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 01:40 PM2022-10-11T13:40:41+5:302022-10-11T13:46:46+5:30

आजकाल प्रत्येक चौकात ATM मशीन बसवलेले आढळतात. पण, एका बँकेने चक्क डोंगराच्या माथ्यावर एटीएम बसवले आहे.

ATM machine: आजकाल प्रत्येक चौकात ATM मशीन बसवलेले आढळतात. लोकांना रोकड काढण्यास काही अडचण येऊ नये, यासाठी बँका जवळपास सर्व ठिकाणी आपली ATMमशीन बसवत असतात. जागोजागी असलेल्या ATMमुळे लोकांचे जीवन सुसह्य झाले आहे. पण, एका बँकेने चक्क डोंगराच्या माथ्यावर एटीएम मशीन बसवले आहे.

जगातील सर्वात उंच ATM- हे जगातील सर्वात उंच एटीएम असून, तिथे जाण्यासाठी ढगांमधून जावे लागते. तुम्ही म्हणाल, त्या एटीएममधून कोण पैसे काढत असेल? पण, या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लोकांची लाईन लागलेली असते. हे ATM जगातील सर्वात उंच चीन आणि पाकिस्तानमधील खंजराब पासच्या सीमेवर आहे. पाकिस्तानातील बर्फाच्छादित पर्वताच्या माथ्यावर हे एटीएम बसवण्यात आले आहे. या भागात देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात आणि पैसे काढतात. हे ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.

पाकिस्तानी बँकेचे ATM- नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानने (NBP) 2016 मध्ये या एटीएमची सुरुवात केली. विशेष म्हणजे, या ठिकाणी वीज उपलब्ध नसल्यामुळे, हे एटीएम चालविण्यासाठी सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेची मदत घेतली जाते. 4,693 मीटर उंचीवर बांधलेल्या या एटीएमचे नाव 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवले गेले आहे.

ढगांमधून जावे लागते- या ATM मशीनचा वापर सीमाभागाजवळ राहणारे नागरिक, सीमा सुरक्षा दल आणि पर्यटक करत असतात. विशेष म्हणजे, हे जगातील सर्वात उंच एटीएम असल्यामुळे, ही जागा पर्यटकांना आकर्षित करते. या एटीएममधून पैसे काढणाऱ्या अनेक पर्यटकांनी 'आकाशातून पैसे काढल्यासारखे' वाटत असल्याचे सांगितले. या एटीएमला भेट देणे आणि येथून पैसे काढतानाची छायाचित्रे क्लिक करून, ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

एटीएमची देखरेख करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितले होते की, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे चार महिने लागले. येथून सर्वात जवळील NBP बँक 87 किलोमीटर अंतरावर आहे. खराब हवामान, अवघड डोंगररांगामधून बँक कर्मचारी या मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी जात असतात. या मशीनमधून दर 15 दिवसांत सरासरी 40-50 लाख रुपये काढले जातात.