येथील कैद्यांना स्वत:च खोदावी लागते स्वत:ची कबर, त्यांच्यासोबत दुष्कर्मही केले जातात!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 03:19 PM2020-02-20T15:19:36+5:302020-02-20T15:35:45+5:30

जगात एक असाही तुरूंग आहे जिथे कैद्यांना स्वत:च स्वत:ची कबर खोदावी लागते. खरंतर यावर सहज विश्वास बसत नाही. पण येथील काही कैद्यांनी हे खरं असल्याचं म्हटलं आहे.

अनेकदा सिनेमांमध्ये आपण पाहतो की, कैद्यांना तुरूंगात कशी वाईट वागणूक दिली जाते. अशा अनेक घटनाही तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, जगात एक असाही तुरूंग आहे जिथे कैद्यांना स्वत:च स्वत:ची कबर खोदावी लागते. खरंतर यावर सहज विश्वास बसत नाही. पण येथील काही कैद्यांनी हे खरं असल्याचं म्हटलं आहे.

हा तुरूंग आहे उत्तर कोरियातील. तसा उत्तर कोरिया हा देश हुकूमशहा किम जोंग उन यांच्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. येथील कठोर नियमही लोकांना चांगलेच माहीत आहेत. येथील तुरूंगात असलेल्या कैद्यांसोबत कसा व्यवहार करावा लागतो हेही कधी लपून राहिलं नाही. खासकरून परदेशी कैद्यांसोबत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कैद्यांकडून जबरदस्तीने मजुरी करून घेतली जाते.

असे म्हणतात की, उत्तर कोरियातील तुरूगांमधील कैद्यांना फारच लहान सेलमध्ये झोपवलं जातं. इतकेच नाही तर त्यांना खायला उंदीर आणि बेडूक दिले जातात. तसेच नियमितपणे त्यांना मारहाणही केली जाते. २४ तासातील १२ तास त्यांच्याकडून कठोर परिश्रण करून घेतले जातात. (सांकेतिक छायाचित्र)

तसेच २०१६ मध्ये २२ वर्षीय अमेरिकन विद्यार्थी ओट्टो वार्मबिअरवर सुद्धा एका हॉटेलमधील बिलबोर्ड चोरी करण्याच्या प्रयत्नाचा आरोप होता. त्याला १५ वर्षांची कठोर मजुरीची शिक्षा देण्यात आली होती. पण त्यालाही नंतर सोडण्यात आले होते. त्यानंतर तो कोमात गेला होता.

उत्तर कोरियातील कायदे फारच कठोर आहेत. २०१२ मध्ये उत्तर कोरियात गेलेल्या केनेथ बे नावाच्या कोरियाई-अमेरिकन व्यक्तीकडे एक धार्मिक सामग्री असलेली हार्ड डिस्क मिळाली होती. त्यानंतर त्याला जबरदस्तीने १५ वर्ष मजुरी करण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. पुढे आरोग्य बिघडल्याने त्याला २०१४ मध्ये सोडण्यात आलं होतं.

एमनेस्टी इंटरनॅशनलनुसार, उत्तर कोरियातील तुरूंग हे जगातल्या सर्वात वाईट तुरूंगापैकी एक आहेत. इथे लहान मुलांसह हजारो लोकांना जेल कॅम्प आणि येथील तुरूंगामध्ये ठेवले जाते. असे म्हणतात की, यातील तर काही लोक असेही आहेत ज्यांनी काही गुन्हेही केलेले नाहीत. पण तरी सुद्धा ते कैदेत आहेत.

असेही सांगितले जाते की, उत्तर कोरियातील तुरूंगांमध्ये कैद्यांना त्यांची स्वत:ची कबर खोदण्यासाठी भाग पाडलं जातं. त्यासोबतच शिक्षेच्या नावाखाली त्यांच्यासोबत दुष्कर्मही केलं जातं. इतकेच नाही तर पीडित कैदी अचानक गायबही होतात. नंतर त्यांचा काही पत्ताच लागत नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर कोरियातील तुरूंगात राहिलेले केनेथ बे यांनी त्यावेळी सांगितले होते की, उत्तर कोरियात राहणाऱ्या तेथील लोकांना बाहेरील जगाबाबत काहीच माहीत नसतं. त्यांना असं वाटतं की, अमेरिकेत ९९ टक्के लोक गरिब आहेत. तेव्हा केनेथने यांनी त्यांना खरी परिस्थिती सांगितली. पण ते लोक मान्य करायला तयारच नव्हते. (Image Credit : opendoorsusa.org)