५जीच्या युगात 'हा' देश अजूनही इंटरनेटविना! ना फेसबुक, ना व्हॉट्सअॅप; मग जगाशी संपर्क कसा होतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 22:02 IST2026-02-07T21:57:43+5:302026-02-07T22:02:12+5:30
तुम्हाला विश्वास बसेल का? जगात एक असाही देश आहे, जिथे आजही ३जी, ४जी किंवा ५जी सेवा पोहोचलेली नाही.

आजच्या धावपळीच्या युगात आपण इंटरनेटशिवाय पाऊलही टाकू शकत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सोशल मीडिया, व्हिडिओ कॉल्स आणि हाय-स्पीड इंटरनेट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. पण तुम्हाला विश्वास बसेल का? जगात एक असाही देश आहे, जिथे आजही ३जी, ४जी किंवा ५जी सेवा पोहोचलेली नाही.

या देशाचे नाव आहे 'इरिट्रिया'. जेव्हा संपूर्ण जग 'डिजिटल इंडिया' किंवा 'ग्लोबल व्हिलेज'च्या गप्पा मारत आहे, तेव्हा इरिट्रिया मात्र अजूनही केवळ साध्या व्हॉईस कॉल आणि एसएमएसवर अवलंबून आहे.

इरिट्रिया हा जगातील असा एकमेव देश आहे जिथे सामान्य जनतेसाठी मोबाईल डेटा सेवा उपलब्ध नाही. लोकांच्या हातात मोबाईल असले तरी ते फक्त एकमेकांना फोन करण्यासाठी किंवा साधा मेसेज पाठवण्यासाठी वापरले जातात. तिथे इंटरनेट सर्फिंग किंवा युट्युबवर व्हिडिओ पाहणे ही गोष्ट सर्वसामान्यांसाठी अशक्यप्राय आहे.

या देशात इंटरनेट वापरायचे असेल तर राजधानीतील काही मोजक्याच इंटरनेट कॅफेमध्ये जावे लागते. हे कॅफे सुद्धा सरकारी मान्यतेने चालवले जातात. विशेष म्हणजे, तिथे इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला तुमचे अधिकृत ओळखपत्र दाखवावे लागते. या कॅफेमधील इंटरनेटचा वेग इतका संथ आहे की, एखादे साधे पेज उघडायलाही खूप वेळ लागतो.

इरिट्रियामध्ये इंटरनेट वापरणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तिथे एका तासाच्या इंटरनेट वापरासाठी जवळपास १०० रुपये मोजावे लागतात. शिवाय, तुम्ही गुगलवर काय शोधताय किंवा कोणाशी काय बोलताय, यावर सरकारी यंत्रणांची करडी नजर असते. टेलीकम्युनिकेशन क्षेत्रावर सरकारचे पूर्ण नियंत्रण असल्याने तिथे खासगी कंपन्यांना थारा नाही.

इंटरनेटच नसेल तर हा देश बाहेरील जगाशी कसा जोडलेला राहतो? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. त्याचे उत्तर आहे इंटरनॅशनल कॉल्स परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी आजही महागडे आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्स हाच एकमेव मार्ग आहे. जरी हे कॉल्स महाग आणि अनिश्चित असले, तरी संवादाचे तेच प्रमुख माध्यम आहे.

स्थानिक माध्यमांवर सरकारचे नियंत्रण असले तरी, अनेक घरांमध्ये आंतरराष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी चोरून-लपून सॅटेलाईट टेलिव्हिजनचा वापर केला जातो. इथिओपिया, सुदान आणि युरोपमध्ये इरिट्रियाचे अनेक नागरिक स्थायिक आहेत. जेव्हा हे लोक सुट्टीसाठी मायदेशी परततात, तेव्हा ते सोबत जगातील बातम्या, नवीन अपडेट्स आणि तंत्रज्ञानाची माहिती घेऊन येतात.

















