केवळ पिवळ्याच नाही तर काळ्या, गुलाबी आणि हिरव्या रंगाचं देखील असतं सोनं, पाहा काय असतो यांमध्ये फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:51 IST2025-12-18T12:14:30+5:302025-12-18T12:51:03+5:30

Gold Different Colour : हे रंग सोन्याचे नैसर्गिक शुद्ध शेड्स नसतात, तर सोने इतर धातूंमध्ये मिसळून किंवा त्यावर खास ट्रीटमेंट करून तयार केले जातात. चला तर मग, वेगवेगळ्या रंगांच्या सोन्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Gold Different Colour : सोनं म्हटलं की, सगळ्यांच्याच डोळ्यांसमोर चमकदार पिवळा धातू येतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, सोनं केवळ पिवळ्या रंगाचंच नसतं. ते इतरही काही रंगांमध्ये मिळतं. आपल्याला विश्वास बसणार नाही, पण सोनं गुलाबी, पांढरं, काळं, हिरवं, निळ्या आणि अगदी जांभळ्याही रंगांचं असतं. हे रंग सोन्याचे नैसर्गिक शुद्ध शेड्स नसतात, तर सोने इतर धातूंमध्ये मिसळून किंवा त्यावर खास ट्रीटमेंट करून तयार केले जातात. चला तर मग, वेगवेगळ्या रंगांच्या सोन्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पिवळं सोनं दिसायला नैसर्गिक सोन्याच्या सर्वात जवळचे असते. शुद्ध सोने चांदी आणि तांब्याबरोबर मिसळून ते तयार केले जाते, ज्यामुळे पिवळा रंग ठळक राहतो.

गुलाबी सोन्याला ‘रोज गोल्ड’ असंही म्हणतात. हे सोलं तांब्याच्या मिश्रणाने तयार केलं जातं. तांब्याचं प्रमाण जितकं जास्त, तितका गुलाबी रंग गडद दिसतो. तांब्यामुळे हे सोलं पिवळ्या किंवा पांढऱ्या सोन्यापेक्षा अधिक मजबूत आणि टिकाऊ ठरतं.

पांढरं सोनं तयार करण्यासाठी सोन्यात निकेल, पॅलेडियम किंवा प्लॅटिनमसारख्या पांढऱ्या धातू मिसळल्या जातात. त्याची चमक वाढवण्यासाठी सहसा त्यावर रोडियमची कोटिंग केली जाते.

काळं सोनं नैसर्गिकरित्या काळं नसतं. त्याचा गडद रंग इलेक्ट्रोप्लेटिंग, ऑक्सिडेशन किंवा केमिकल पॅटिनेशनसारख्या ट्रीटमेंटमुळे मिळतो. काळ्या सोन्याचा वापर प्रामुख्याने डिझायनर ज्वेलरी आणि लक्झरी घड्याळांमध्ये केला जातो.

हिरवं सोनं सोन्यात चांदी आणि कधी कधी झिंक मिसळून तयार केले जाते. त्यामुळे त्याला हलका हिरवा किंवा हिरवट-पिवळा रंग येतो. प्राचीन काळातील दागिन्यांमध्ये हिरव्या सोन्याचा वापर केला जात असे.

निळं सोनं सोन्यात लोखंड किंवा गॅलियमसारख्या धातू मिसळून बनवले जाते. यामुळे निळा रंग मिळतो, मात्र ही धातू खूप नाजूक होते. जांभळं सोनं सोन्यात अ‍ॅल्युमिनियम मिसळून तयार केले जाते.