'हे' आहे जगातील सर्वात मोठे मेंटल हॉस्पिटल, एकेकाळी होते 12 हजार रुग्ण; आता झाली अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 03:51 PM2021-10-05T15:51:40+5:302021-10-05T15:57:38+5:30

या रुग्णालयात रुग्णांवर अत्यंत अमानुष पद्धतीने उपचार केले जात होते.

तुम्हाला साहसी आणि भुताची ठिकाणे पाहण्याची आवड असेल तर आम्ही तुम्हाला एक उत्तम ठिकाण सांगणार आहोत. हे ठिकाण जगातील सर्वात मोठे वेड्यांचे रुग्णालय आहे. अमेरिकेतील जॉर्जिया येथील सेंट्रल स्टेट हॉस्पिटल हे जगातील सर्वात मोठं वेड्यांचे रुग्णालय आहे.

एकेकाळी या रुग्णालयात हजारो पागल रुग्णांवर उपचार होत असत. पण, मागील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे आता या ठिकाणी भूतांचा वास असल्याचं मानलं जात आहे. या ठिकाणी यायलाही लोक घाबरतात. बऱ्याच वर्षानंतर आता हे रुग्णालय सामान्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

डेली मेलमधील बातमीनुसार, हे रुग्णालय 1842 मध्ये बांधलं होतं. 1960 पर्यंत हे जगातील सर्वात मोठं वेड्यांच रुग्णालय झालं. त्यावेळी येथे 12 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले जात होते. पण, हळूहळू रुग्णांची संख्या कमी झाली आणि रुग्णालयाच्या अनेक इमारती भग्नावस्थेत बदलल्या.

एका अहवालांनुसार, या रुग्णालयात रुग्णांवर अत्यंत अमानुष पद्धतीने उपचार केले जात होते. तसेच, त्यांच्याशी अतिशय चुकीच्या पद्धतीने वागणूक केली जायची. येथे मुलांना लोखंडाच्या पिंजऱ्यात ठेवले जायचे, तर मोठ्यांना जबरदस्तीने स्टीम बाथ आणि थंड पाण्याने आंघोळ करण्यास भाग पाडले जायचे.

सध्या या रुग्णालयाची अवस्था अशी आहे की, एक हजार एकरमध्ये बांधलेल्या रुग्णालयाच्या 200 हून अधिक रिक्त इमारतींमध्ये भूत पकडणारे येऊ लागले आहेत. काहीजण या रुग्णालयात भूत असल्याचा दावा करतात. या रुग्णालयाच्या आसपास राहणाऱ्या लोकांच्या मते त्यांना अनेकदा रुग्णांचे विचित्र अवाज ऐकू येतात.

मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयाच्या आवारात 25 हजारांहून अधिक रुग्णांना दफन करण्यात आलं आहे. त्या रुग्णांच्या मृतदेहासह त्यांच्या नावांच्या प्लेट्सही येथे पुरल्या आहेत. हळुहलू रुग्णालयाची अवस्था अत्यंत वाईट झाली आणि येथे येणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होत गेली.

सध्या या हॉस्पिटलचा फक्त एक छोटासा भाग सक्रिय आहे, ज्यामध्ये सुमारे 300 लोकांवर उपचार केले जातात, परंतु आता उपचाराच्या पद्धती खूप बदलल्या आहेत. बऱ्याचदा स्थानिक लोक लपूनछपून रुग्णालय पाहण्यासाठी यायचे, यामुळे जानेवारी 2020 पासून रुग्णालय सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.

हे रुग्णालयत आता सामान्यांसाठी खुलं झालं आहे. रुग्णालयाकडून दर महिन्याला हे रुग्णालय सामान्यांसाठी उघडलं जातं. यादरम्यान, सामान्य नागरिक रुग्णालयात येऊन सर्व परिसर पाहू शकतात. त्यांना रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णालयाचा इतिहासही सांगितला जातो.