अरावलीच्या कुशीत दडलाय 'कुबेराचा खजिना', मुघल काळापासून आजपर्यंत न उलगडलेलं रहस्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:43 IST2025-12-23T15:36:47+5:302025-12-23T15:43:32+5:30

Aravalli Range : इ.स. 1492 मध्ये हसन खान मेवातीने केलेली या 5 किलोमीटर लांब अन् 1.5 किलोमीटर रुंद किल्ल्याची पायाभरणी!

Aravalli Range : अरावली पर्वतरांगेच्या उंचीवरुन सुरू असलेल्या वादाची देशभरात चर्चा सुरू आहे. 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या पर्वताला अरावली मानले जाणार नाही, या न्यायालयाच्या निर्णानंतर हजारो लोकांनी याविरोधात आंदोलन छेडले आहे. भाजप आणि काँग्रेसही या मुद्द्यावरुन आमने-सामने आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर, आम्ही तुम्हाला अरावली परिसरातील उंच कड्यावर उभारलेल्या अलवरच्या बाला किल्ल्याबद्दल रंजक माहिती देणार आहोत.

हा किल्ला केवळ एक ऐतिहासिक वास्तू नाही, तर तो शतकानुशतके न उलगडलेले एक रहस्यदेखील आहे. बाहेरुन शांत आणि भव्य दिसणारा हा किल्ला आपल्या गर्भात असे अनेक गूढ राज दडवून बसला आहे, ज्यांचा उलगडा आजतागायत झालेला नाही. पार मुघल काळापासून ते आजपर्यंत हे रहस्य उलगडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे.

आज ज्या अरावली पर्वतरांगांकडे केवळ दगड-मातीचा ढिगारा म्हणून पाहिले जाते, त्या सुमारे 2.5 अब्ज वर्षे जुन्या आहेत. या पर्वतरांगा वाळवंटाची तप्त हवा अडवून उत्तर भारताला थंडगार ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, याच अरावलीच्या एका उंच शिखरावर बाला किल्ला आजही इतिहासाचा प्रहरी म्हणून ताठ मानेने उभा आहे.

आज पर्यटक मोठ्या संख्येने बाला किल्ल्याला भेट देतात. मात्र एकेकाळी परिस्थिती वेगळी होती. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची (एसपी) विशेष परवानगी घ्यावी लागत असे. आज मात्र मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रजिस्टरमध्ये नाव नोंदवले की, या रहस्यमय आणि जादुई विश्वात प्रवेश करता येतो. तरीही अरावलीच्या कुशीत वसलेला हा किल्ला जितका शांत दिसतो, तितकीच त्याची गूढता खोल आहे.

बाला किल्ल्याशी संबंधित सर्वात चर्चेत असलेली कथा म्हणजे, येथे दडलेला ‘कुबेराचा खजिना’. लोककथांनुसार, या किल्ल्याच्या गाभाऱ्यात धनदेवता कुबेराचा अमूल्य खजिना दडलेला आहे. मुघलांनी पूर्ण ताकद लावली, मराठ्यांनी वेढा घातला, जाटांनीही प्रत्येक कोपरा धुंडाळला, मात्र हा खजिना आजतागायत कुणालाच सापडलेला नाही. काहींना ही केवळ दंतकथा वाटते, तर काहींच्या मते खजिन्याचा शोध घेणारा पुन्हा कधी परतत नाही. त्यामुळे आजही हा खजिना इतिहासप्रेमी आणि साहसप्रेमींसाठी एक मोठे कोडे ठरला आहे.

इ.स. 1492 मध्ये हसन खान मेवाती यांनी या किल्ल्याची पायाभरणी केली. सुमारे 5 किलोमीटर लांब आणि 1.5 किलोमीटर रुंद असलेला हा किल्ला त्याच्या अनोख्या रचनेसाठी ओळखला जातो. किल्ल्याच्या भिंतींमध्ये 446 लहान छिद्रे तयार करण्यात आली होती, ज्यातून सैनिक 10 फूट लांबीच्या बंदुकांनी शत्रूंवर अचूक मारा करायचे. शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी येथे 66 बुरुज (15 मोठे आणि 51 छोटे) बांधण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे मुघल, मराठा आणि जाट अशा अनेक सत्तांनी या किल्ल्यावर अधिराज्य गाजवले, तरीही इतिहासात येथे कधीही मोठे युद्ध झाले नाही. म्हणूनच या किल्ल्याला ‘कुंवारा किल्ला’ असेही म्हटले जाते.

इतिहासाच्या नोंदी सांगतात की, या किल्ल्याच्या वैभवाने मुघल बादशहांनाही भुरळ घातली होती. बादशहा बाबर याने आपल्या विजयांनंतर येथे केवळ एक रात्र मुक्काम केला होता. तर शहजादा सलीम, म्हणजेच जहांगीर, याने येथेच आपले वास्तव्य केले होते. ज्या कक्षात जहांगीर राहत होता, तो आज ‘सलीम महाल’ म्हणून ओळखला जातो. जय पोल, सूरज पोल, लक्ष्मण पोल, चांद पोल, कृष्णा पोल आणि अंधेरी पोल अशी सहा भव्य प्रवेशद्वारे असलेल्या या किल्ल्याचा प्रत्येक दगड इतिहासाची वेगळीच कहाणी सांगतो.

याच कारणामुळे बाला किल्ला आज केवळ ऐतिहासिक वास्तू न राहता, इतिहास आणि रहस्य यांचा अद्भुत संगम ठरला आहे. इतिहासप्रेमी आणि साहसाची ओढ असणाऱ्यांसाठी हा किल्ला एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही.