आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:34 IST2025-10-10T17:23:48+5:302025-10-10T17:34:46+5:30
Donald Trump News: जगभरात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा आज झाली असून, हा पुरस्कार मिळवण्यासाठी उत्सुक असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याऐवजी हा पुरस्कार व्हेनेझुएलातील लोकशाही समर्थक नेत्या मारिया कुरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे.

जगभरात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा आज झाली असून, हा पुरस्कार मिळवण्यासाठी उत्सुक असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याऐवजी हा पुरस्कार व्हेनेझुएलातील लोकशाही समर्थक नेत्या मारिया कुरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा यासाठी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर, कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट आणि अमेरिकन खासदार बडी कार्टर यांना नामांकन पाठवलं होत. मात्र या पुरस्कारांसाठी नामांकन पाठवण्याची शेवटची तारीख असलेल्या १ फेब्रुवारीनंतर पोहोचल्याने ही नामांकनं बाद झाली आणि या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांची संधी हुकली.
दरम्यान, गेल्या वर्षभरात मी आठ युद्धे थांबवली आहेत. त्यामुळे नोबेल शांतता पुरस्कारासाठी मीच योग्य आहे. मला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे म्हणून स्वत:चं नाव पुढे रेटणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव निवड समितीने नोबेल शांतता पुरस्कारासाठी का निवडलं नाही. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांना या पुरस्काराने का हुलकावणी दिली, याची काही कारणं आता समोर येत आहेत.
नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव निवड समितीकडून निवडण्यात न आल्याच्या कारणांमधील पहिलं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्याा पुढाकाराने झालेला गाझा शांतता करार हा समितीने पुरस्कार विजेत्याचं नाव निश्चित केल्यानंतर झाला. समितीने विजेत्याचं नाव आधीच निश्चित करून ठेवले होते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा पुरस्कार मिळवण्यासाठीचा शेवटचा प्रयत्नही निष्फळ ठरला.
जागतिक पातळीवरील काही तज्ज्ञांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांचे शांतता प्रस्थापित करण्यासाठीचे प्रयत्न हे दीर्घकालीन आणि टिकावू नव्हते. नॉर्वेमधील शांततावादी संशोधक नीना ग्रेगर यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओ आणि पॅरिस क्लायमेट अॅग्रिमेंटमधून अमेरिकेला बाहेर काढले, ही बाब नोबेलच्या भावनेविरुद्ध होती.
नोबेलची मूळ भावना ही लोकशाही आणि मानवाधिकारांच्या बाजूने आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांची हुकूमशाहांशी असलेली मैत्री आणि पुतीन यांच्याशी असलेली जवळीक ही त्यांच्या विरोधात गेली, असे इतिहासकार अॅश्ले स्वीन यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या वर्षभरात इस्राइल-इराण, अर्मेनिया-अझरबैजान, भारत-पाकिस्तान, सर्बिया-कोसोवो, थायलंड-कंबोडिया, इजिप्त-इथिओपिया, रवांडा-डीआरसी आणि गाबॉन यासारख्या आठ ठिकाणची युद्ध मी थांबवली, असा दावा डोनाल्ड ट्र्म्प हे वारंवार करत होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांबातत जगभरातील अनेक देशांनी मौन पाळणं पसंत केलं होतं. तर काही देशांनी ट्रम्प यांचा दावा म्हणजे राजकीय प्रचार असल्याचा आरोप केला होता.