Parag Agarwal : १० वर्षांत मारली ट्विटरच्या CEO पदापर्यंत मजल, कोण आहेत पराग अग्रवाल? कसा आहे त्यांचा प्रवास, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 07:42 AM2021-11-30T07:42:25+5:302021-11-30T07:46:28+5:30

Parag Agarwal New Twitter CEO: पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये नोकरीस सुरुवात केल्यापासून १० वर्षांत कंपनीच्या सीईओ पदापर्यंत मजल मारली आहे. पराग अग्रवाल कोण आहेत आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा झालाय हे आज आपण जाणून घेऊयात.

ट्विटरचे नवे सीईओ म्हणून पराग अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. ट्विटरच्या सीईओपदावरून राजीनामा दिल्यानंतर कंपनीचे मावळते सीईओ जॅक डोर्सी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

पराग अग्रवाल सध्या कंपनीमध्ये सीटीओ (चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर) म्हणून काम करत आहेत. पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये नोकरीस सुरुवात केल्यापासून १० वर्षांत कंपनीच्या सीईओ पदापर्यंत मजल मारली आहे. पराग अग्रवाल कोण आहेत आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा झालाय हे आज आपण जाणून घेऊयात.

पराग अग्रवाल यांनी आयआयटी मुंबईमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स विषयात पीएचडी केली होती.

AT&T, याहू आणि मायक्रोसॉफ्टमध्ये काम केल्यानंतर पराग यांनी २०११ मध्ये ट्विटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम सुरू केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांना ट्विटरमध्ये चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पदी बढती देण्यात आली.

ट्विटरचे मावळते सीईओ जॅक डोर्सी हे पराग अग्रवाल यांच्या कामाचे नेहमी कौतुक करत असत. ही बाब त्यांच्या ट्विटरमधील प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण ठरली. डोर्सी यांनीच २०११ मध्ये त्यांची निवड केली होती. दरम्यान, आता पराग यांची सीईओपदी निवड करतानाही डोर्सी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. सीटीओ म्हणून पराग यांनी मशिन लर्निंगवर खूप काम केले. आता केवळ दहा वर्षांच्या काळात ते या कंपनीचे सीईओ बनले आहेत.

ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्याबरोबर पराग अग्रवाल हे सिलिकॉन व्हॅलीमधील भारतीय वंशाच्या सीईओंच्या यादीत सामील झाले आहेत. ज्यांच्यामध्ये सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांचा समावेश आहे.