फुटबॉलपटू कसा बनला अंतराळावीर, जाणून घ्या कोण आहेत बॅरी बुच विल्मोर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 21:12 IST2025-03-22T21:03:20+5:302025-03-22T21:12:10+5:30

Know About Barry butch wilmore: आठ दिवसांसाठी अवकाशात गेलेले सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर तब्बल नऊ महिने अडकले होते. अखेर ते पृथ्वीवर परतले. भारतात सुनीता विल्यम्स यांची चर्चा होत आहे. पण, बॅरी बुच विल्मोर यांनाही विसरता येणार नाही. जाणून घ्या त्यांच्याबद्दल...

जून २००० मध्ये हजारो अर्जामधून 'नासा'ने अमेरिकन नौदल कॅप्टन बॅरी बुच विल्मोर यांची निवड केली. आपण अंतराळात जाणार, या विचाराने ते हुरळून गेले होते. खरं तर तेव्हा नुसती निवडच झाली होती.

पुढचं काहीच स्पष्ट नव्हतं; पण जे इतरांना दिसत नव्हतं, ते मात्र विल्मोर यांना स्पष्ट दिसत होतं. आपण तिथपर्यंत पोहोचणारच, हे लक्ष्य त्यांनी ठरवलेलं होतं. ते लक्ष्य पकडून ठेवणं आणि त्यापर्यंत पोहोचणं यात फुटबॉलपटू असलेल्या विल्मोर यांचा हातखंडा होता.

विद्युत अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाची निवड करून कॉलेजात गेलेले विल्मोर फुटबॉलच्याही प्रेमात पडले. खरं तर फुटबॉलपटूसाठी लागणारी उंची, वजन या चौकटीत ते बसत नव्हतेच; पण आपण यशस्वी फुटबॉलपटू व्हायचं, हे ध्येय त्यांनी ठरवलेलं होतं.

एकीकडे मानसिक ताकदीचा कस लागणारा किचकट अभ्यासक्रम आणि दुसरीकडे शारीरिक क्षमतांची मागणी करणारा फुटबॉल. ही दुहेरी कसरत यशस्वीरीत्या पार पाडत त्यांनी डिग्री मिळवली आणि फुटबॉल खेळताना डिफेन्डर म्हणून टॅकलचे विक्रम नोंदवले.

सतत आव्हानांच्या शोधात असणाऱ्या विल्मोर यांना विमानवाहू जहाजांवर विमान उतरवण्याच्या आव्हानात स्वतःसाठी संधी दिसली. अमेरिकन नौदलात कॅप्टन म्हणून ७००० हून अधिक तास उड्डाण केलं आणि ६६३ वेळा विमान जहाजावर उतरवलं.

जिथे जाऊ तिथे आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणारे विल्मोर यांनी नंतर 'नासा'चे अंतराळवीर म्हणून तीन स्पेसफ्लाइटमध्ये भाग घेतला. त्यांनी एकूण ४६४ दिवस अंतराळात मुक्काम केला आहे. 'आम्ही थोड्या दिवसांसाठी अंतराळात गेलो होतो; पण मनाने दीर्घ मुक्कामाची तयारी केलेली होती.

अनोळखी, अनपेक्षित आणि आकस्मिक परिस्थितीसाठी तयार राहणं हे सामान्यांना आव्हान वाटत असलं तरी आम्हा अंतराळवीरांसाठी हे सवयीचंच आहे,' असं सहजपणे म्हणणाऱ्या विल्मोर यांना सवयीप्रमाणे आत्ताही कुठल्या तरी आव्हानाची ओढ लागलेली असेलच...!