"जमाव हल्ला करत होता आणि ट्रम्प टीव्ही पाहत होते," कॅपिटॉल हल्ल्याच्या आठवणींनी बायडेन झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 08:45 AM2022-01-07T08:45:12+5:302022-01-07T08:50:32+5:30

देशाच्या इतिहासात शांततामय वातावरणातही सत्ता हस्तांतरण रोखण्याच्या प्रयत्न केला गेला, बायडेन यांचं वक्तव्य.

अमेरिकेच्या कॅपिटॉल म्हणजेच संसदेवरील ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं. या निमित्तानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देशाला संबोधित केलं. तसंच यावेळी त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खोटं पसवण्याचा आरोपही केलं.

कॅपिटॉलवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हल्ल्याला गुरूवारी एक वर्ष पूर्ण झालं. यावेळी बायडेन यांनी या घटनेचा निषेध केला. तसंच अमेरिकेन लोकशाहीच्या भविष्याबद्दलही बायडेन यांनी चिंता व्यक्त केली.

"आपल्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं असेल जेव्हा देशाच्या राष्ट्राध्यक्षांचा ना केवळ पराभव झाला, पण त्यांनी शांततामय वातावरणात सत्तेचं हस्तांतरणही रोखण्याचा प्रयत्न केला. जमाव कॅपिटॉलमध्ये दाखल झाला. परंतु ते अयशस्वी ठरले," असं बायडेन म्हणाले.

"तो लोकशाहीवर करण्यात आलेला हल्ला होता. आमच्या बाजूनं लोकांनी कल दिला आणि आमचा विजय झाला," असंही ते म्हणाले. राष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रेट खासदारांच्या दिवसाची सुरूवात स्टॅच्युरी हॉलमधून झाली. ज्या ठिकाणी जमावानं हल्ला केला होता, त्यापैकीच हे एक ठिकाण आहे.

या प्रसंगी, बायडेन यांनी कॅपिटलवरील हल्ल्याचे सत्य आणि खोटे कथन यातील फरक सांगितला. यामध्ये रिपब्लिक पक्षाद्वारे बायडेन यांना २०२० च्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयाचं सातत्यानं नाकारणं हेदेखील सामील आहे.

"तुम्ही आणि मी, संपूर्ण जगानं जे काही घडलं ते आपल्या डोळ्यानं पाहिलं," असंही त्यांनी नमूद केलं. तुम्ही डोळे बंद करा आणि त्या दिवसाची आठवण करा. तुम्हाला भयभीत करणारी त्या दिवसाची दृश्यच दिसतील. जमाव पोलिसांवर हल्ला करत होता, अध्यक्षांना धमकावत होता, असंही त्यांनी नमूद केलं.

यावेळी उप-राष्ट्राध्यक्षांना फाशी देण्याची धमकी दिली जात होती. परंतु हे जेव्हा घडत होतं तेव्हा तत्कालिन राष्ट्राध्यक्ष टीव्हीवर हे पाहत होते. ६ जानेवारी २०२१ च्याबाबत हे एक इश्वरी सत्य आहे की ते संविधानाला नष्ट करू पाहत होते, असंही बायडेन म्हणाले.

६ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये डेमोक्रेट स्वत: अथवा डिजिटल माध्यमातून उपस्थित होते आणि जवळपास रिपब्लिकन कॅपिटल हिलमधून अनुपस्थित होते.

डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडे अमेरिकीची सूत्रे जाणार, हे स्पष्ट होताच शेकडो ट्रम्प समर्थकांनी थेट अमेरिकी संसदेवरच हल्ला चढवला होता. कॅपिटॉल हिल परिसरातील संसद इमारतीत घुसून ट्रम्प समर्थकांनी कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. तसंच या वेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते. आंदोलकांनी चार तास संसद वेठीस धरली होती.