चीनच्या वाढत्या आर्थिक आणि सैन्य ताकदीचं अमेरिकेला 'टेन्शन', आता भारताबाबत घेणार मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:25 PM2021-07-21T16:25:20+5:302021-07-21T16:46:03+5:30

US Continue Expand Ties With India: चीनच्या वाढत्या आर्थिक आणि सैन्य ताकदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आता भारताबाबत नवी रणनिती आखण्याचा विचार करत आहे. अमेरिकेच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय? जाणून घेऊयात...

अमेरिकी काँग्रेसच्या एका अहवालानुसार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन येत्या काळात भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यावर जास्तीत जास्त भर देणार आहेत. यामागे एक वेगळंच कारण दडलं आहे.

चीनच्या वाढत्या आर्थिक आणि सैन्य शक्तीचा धसका अमेरिकेनं घेतला आहे. त्यामुळे आपल्या सोबतीला आशियातील एक देश असावा या उद्देशानं भारतासोबतचं संबंध कसे चांगले ठेवता येतील याची रणनिती अमेरिकेकडून आखली जात आहे.

काँग्रेसनल रिसर्च सर्विसनं (सीआरएस) जारी केलेल्या भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांबाबतच्या ताज्या अहवालानुसार भारतासोबत मानवाधिकारांसोबतच अंतर्गत घटनांवरही अमेरिका अधिक लक्ष देणार आहे. पण चीनचा वाढता दबदबा लक्षात घेता भारतासोबत संबंध चांगले राहावेत यासाठी द्विपक्षीय संबंधांमध्ये मोठे बदल केले जाण्याची शक्यता कमी आहे.

बायडन प्रशासन येत्या काळात भारतासोबत द्विपक्षीय संबंधांमध्ये अधिक विस्तार करण्याची शक्यता आहे आणि यामागे चीनची वाढती अर्थव्यवस्था व सैन्य शक्तीची अमेरिकेला चिंता वाटत असल्याचं कारण आहे. त्यामुळे भारतासोबतचं संबंध अधिक दृढ व्हावेत याच उद्देशानं आगामी काळात अमेरिकेची भूमिका राहील, असं सांगण्यात येत आहे.

अरबी सागरी क्षेत्रातील चीनचं वाढतं प्राबल्य लक्षात घेता त्याचा मुकाबला करण्यासाठी अमेरिका जापान, भारत आणि ऑस्टेलियाकडे महत्वाकांक्षेनं पाहात आहे.

राष्ट्रपती जो बायडन यांनी मार्च महिन्यात क्वाडच्या पहिल्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डिजिटल माध्यमातून संवाद साधला होता. सर्वांसाठी खुलं आणि स्वतंत्र क्षेत्राचा आवश्यकता असून स्थिरता प्राप्त करण्यासाठी अमेरिका आपल्या सहकारी देशांसोबत काम करण्यासाठी कटिबद्ध आहे, असं बायडन यांनी म्हटलं होतं.

चीन, दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्री परिसर वादग्रस्त राहिला आहे. चीन आजवर दक्षिण समुद्री क्षेत्रावर आपला दावा करत आला आहे.

पण व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपिन्स, ब्रूनेई आणि तैवान यांनी चीनचा दावा खोडून लावला आहे. त्यामुळे चीनचा बिमोड करण्यासाठी आशियातील इतर देशांशी द्विपक्षीय संबंध घट्ट करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे.