घरी परतली पण दोन बोटं गमावली! तीन इस्रायली नागरिकांची १५ महिन्यांनी सुटका, ह्रदयद्रावक क्षण नेतन्याहूंनी केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:59 IST2025-01-20T13:49:04+5:302025-01-20T13:59:23+5:30

Hamas Released Israeli Hostages: युद्ध थांबवण्याच्या कराराला इस्रायलने मंजुरी दिल्यानंतर हमासने ओलीस ठेवलेल्या काही नागरिकांना सुटका केली. त्याबद्दल इस्रायलनेही काही पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका केली.

युद्ध विराम करारानंतर तेल अवीवमधील वातावरण बदलून गेले. गेल्या १५ महिन्यांपासून हमासच्या कैदेत असलेल्या तीन इस्रायली नागरिक परतताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.

इस्रायल-हमास यांच्या युद्ध शस्त्रसंधी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात तीन इस्रायली महिला घरी परतल्या, ज्यांना हमासने ओलीस ठेवले होते.

रोमी जोनेन, डोरोन स्टीनब्रीचर आणि एमिली डेमरी या तीन महिलांची हमासने सुटका केली. यांना रेड क्रॉस अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्या इस्रायलमध्ये परतल्या.

हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात १२०० इस्रायली नागरिक मारले गेले होते. त्याचवेळी या तीन महिलांना अतिरेक्यांनी पकडून ओलीस ठेवले होते.

या तीन महिलांच्या मोबदल्यात इस्रायलने ९० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आहे. करारानुसार पहिल्या टप्प्यात सुटका झालेले ओलीस परतल्यानंतरच्या क्षणांचे व्हिडीओ इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी शेअर केला आहे.

इस्रायलचा ध्वज खांद्यावर घेऊन तीन महिला त्यांच्या कुटुंबीयांना भेटल्या. आपल्या माणसांना भेटल्यानंतर तिघींच्याही अश्रूंचा बांध फुटला. कुटुंबातील सदस्यांच्या गळ्यात पडून तिघीही हमसून हमसून रडल्या.

यातील एका महिलेसोबत हमासने भयंकर कृत्य केल्याचे समोर आले. अतिरेक्यांकडून एका महिलेचे दोन बोट कापून टाकण्यात आली आहेत.