मुस्लिम बहुसंख्य असलेल्या 'या' देशात आहेत जवळपास १० हजार हिंदू मंदिरं! तुम्हाला माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 14:40 IST2025-07-09T14:32:04+5:302025-07-09T14:40:49+5:30
जगातील 'या' देशात जवळपास २८ कोटी मुस्लिम लोक राहतात आणि याच देशात हजारो हिंदू मंदिरं आहेत.

इंडोनेशिया या देशात जिथे २८ कोटी मुस्लिम आहेत, तिथे हजारो हिंदू मंदिरं आहेत. हे पाहून कळतं की धर्म, संस्कृती आणि परंपरा कोणत्याही सीमेत अडकत नाहीत. जगात मुस्लिम देश म्हणजे धार्मिक कट्टरता असं अनेकदा बोललं जातं. पण, इंडोनेशियात जिथे ८७% लोक मुस्लिम आहेत, तिथे १०,००० पेक्षा जास्त हिंदू मंदिरं आहेत.
मिशन सनातनमुळे इंडोनेशियातील मंदिरांचा जीर्णोद्धार खूप वेगाने होतोय. एकट्या योग्यकर्ता प्रांतात २४० मंदिरं पुन्हा बांधण्याची योजना सुरू झाली आहे आणि त्यापैकी २२ मंदिरं तयारही झाली आहेत.
प्रंबानन मंदिर हे १० व्या शतकात बांधलेलं इंडोनेशियातील सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे. हे मंदिर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांना समर्पित आहे. याची रचना भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मग्रंथांनी खूप प्रभावित आहे.
भूकंप, ज्वालामुखी आणि वेळेच्या माऱ्याला तोंड देत हे मंदिर आजही डौलाने उभं आहे. युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय आणि हे आजही हिंदू भाविक आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचं ठिकाण आहे.
भारत आणि इंडोनेशियाचे संबंध फक्त व्यापार किंवा राजकारणापुरते मर्यादित नाहीत, तर ते हजारो वर्षांची सांस्कृतिक भागीदारी आहे. इंडोनेशियातील कला, नाटक आणि लोककथांमध्ये आजही रामायण आणि महाभारत जिवंत आहेत.
२०२५ च्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो प्रमुख पाहुणे होते. तेव्हा दोन्ही देशांनी सायबर सुरक्षा, दहशतवादविरोधी, सागरी संरक्षण आणि व्यापारात एकत्र काम करण्याची घोषणा केली.
इंडोनेशियाची राष्ट्रीय विमान कंपनी गरुड इंडोनेशिया असो किंवा त्यांच्या चलनावरील गणेशाचं चित्र असो, यावरून कळतं की या देशाने भारतीय परंपरा आणि सनातन संस्कृतीला किती मनापासून स्वीकारलं आहे. बाली, योग्यकर्ता आणि पूर्व जावामध्ये आजही हिंदू प्रथा रोजच्या जीवनाचा भाग आहेत.