पत्नीने घराच्या बाहेर काढलं, भावाच्या मृत्यूनंतर राजकारणात प्रवेश अन्... बेजांमिन नेतन्याहूंचा PM पदापर्यंतचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:47 IST2025-06-24T17:35:36+5:302025-06-24T17:47:00+5:30

Israel PM Benjamin Netanyahu: इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेलं युद्ध अखेर थांबले आहे. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.आज मध्य पूर्व युद्धाच्या आगीत जळत असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या खासगी आयुष्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

इस्रायल इराण संघर्षादरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आले आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी, २१ ऑक्टोबर १९४९ रोजी जन्मलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे इस्रायली सैन्यात कॅप्टन होते.

बेंजामिन यांचे वडील बेंझियन नेतान्याहू हे एक प्रसिद्ध इतिहासकार होते आणि ज्यूंसाठी वेगळ्या देशाची मागणी करणाऱ्या झिओनिस्ट चळवळीचे कट्टर समर्थक होते. बेंजामिनचे बालपण जेरुसलेममध्ये गेले. १९५६ मध्ये त्यांचे वडील नोकरीसाठी कुटुंबासह अमेरिकेत गेले. बेंजामिन यांनी आपले शिक्षण अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे पूर्ण केले.

वयाच्या १८ व्या वर्षी, बेंजामिन इस्रायलला परतले आणि इस्रायली डिफेन्स फोर्सच्या एलिट युनिट 'सायरेत मटकल' मध्ये स्पेशल कमांडो बनले. १९७२ च्या इस्रायल-अरब युद्धात त्यांनी सहभाग घेतला आणि ते कॅप्टन बनले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी एमआयटीमध्ये प्रवेश घेतला आणि अमेरिकेत आले. १९७४ मध्ये त्यांनी आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी आणि १९७६ मध्ये एमबीए पदवी प्राप्त केली.

२७ जून १९७६ रोजी एअर फ्रान्स फ्लाईट १३९ ने तेल अवीवहून पॅरिससाठी उड्डाण केले होते. मात्र पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी तिचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी विमान युगांडातील एन्टेबे विमानतळावर नेले. तिथे त्यांनी ज्यू आणि इस्रायली प्रवाशांना डांबून ठेवले. अतिरेक्यांनी इस्रायली सरकारकडे ४८ तासांच्या आत ५ दशलक्ष डॉलर्स देण्याची आणि ५३ कैद्यांना सोडण्याची मागणी केली होती.

इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या सायरेत मटकल युनिटने 'ऑपरेशन अटेबेची योजना आखली होती, ज्याचे नेतृत्व बेंजामिन यांचा मोठा भाऊ जोनाथन करत होते. ४ जुलै १९७६ मध्ये हे ऑपरेशन पार पडले ज्यामध्ये १०० हून अधिक प्रवाशांना वाचवण्यात आलं. मात्र जोनाथन यामध्ये शहीद झाले.

१९७८ मध्ये त्यांनी योनाथन इन्स्टिट्यूट नावाचा दहशतवादविरोधी थिंक टँक सुरू केला. त्यांनी स्वतःला दहशतवादविरोधी तज्ज्ञ म्हणून समोर आणलं आणि अमेरिकन टीव्ही कार्यक्रमांमध्ये इस्रायल-पॅलेस्टाईनचा मुद्दा उपस्थित केला. १९८२ मध्ये, बेंजामिन यांनी वॉशिंग्टन डीसी येथील इस्रायली दूतावासात उपप्रमुख म्हणून काम करण्यास सुरुवात केली. दोन वर्षांनंतर, त्यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये इस्रायलचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले. तिथे त्यांनी आक्रमक आणि प्रभावीपणे इस्रायलचे प्रतिनिधित्व केले.

१९८८ मध्ये बेंजामिन इस्रायलला परतले. त्याच वर्षी ते उजव्या विचारसरणीच्या 'लिकुड पार्टी' कडून इस्रायली संसद 'नेसेट' मध्ये पोहोचले आणि परराष्ट्र व्यवहार खात्याचे उपमंत्री झाले. १८ जून १९९६ रोजी, वयाच्या ४७ व्या वर्षी, बेंजामिन हे इस्रायलचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. त्यांचा कार्यकाळात पॅलेस्टाईनचा वाद चिघळला होता. अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या दबावाखाली त्यांना पॅलेस्टिनींसोबत शांतता करार करावा लागला, ज्यामुळे त्यांना १९९९ च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

२००२ मध्ये ते पुन्हा परतले आणि ३१ मार्च २००९ रोजी बेंजामिन पुन्हा पंतप्रधान झाले. ते २०२१ पर्यंत या पदावर राहिले. २९ डिसेंबर २०२२ रोजी ते पुन्हा पंतप्रधान झाले. १९९६ पासून १७ वर्षे ते पंतप्रधान आहेत. इस्रायली पंतप्रधानपदावर सर्वात जास्त काळ काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

बेंजामिन नेतन्याहू इस्रायली सैन्यात असताना ते त्याचा मोठा भाऊ योनी याच्या जेरुसलेममधील घरामध्ये राहत होते. तिथून जवळच मिरियम वेसमन उर्फ ​​मिकी राहत होती. ती देखील लष्करी सेवेत होती. बेंजामिन आणि मिकी प्रेमात पडले आणि १९७२ मध्ये ते अमेरिकेत गेले आणि त्यांनी लग्न केले. १९७८ पर्यंत, मिकी गर्भवती झाली. तेव्हा बेंजामिन यांनी ब्रिट फ्लेअर केट्सशी सूत जुळवलं.

एके दिवशी त्याची पत्नी मिकीने बेंजामिन यांच्या एका सूटवर लांब सोनेरी केस पाहिले आणि त्यांनी बेंजामिन यांना घराबाहेर हाकलून लावले. एप्रिल १९७८ मध्ये, मिकीने हार्वर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये मुलगी नोहाला जन्म दिला. तेव्हा बेंजामिन तिथे उपस्थित नव्हते. नंतर दोघांचा घटस्फोट झाला. १९८१ मध्ये, बेंजामिन यांनी फ्लेअर केट्सशी लग्न केले मात्र तीन वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.

वयाच्या ३९ व्या वर्षी बेंजामिन यांची भेट ३० वर्षीय सारा बेन-आर्टझीशी झाली. सारा या इस्रायली एअरलाइन 'एल अल' मध्ये फ्लाइट अटेंडंट होत्या. गर्भवती झाल्यानंतर त्यांनी मार्च १९९१ मध्ये बेंजामिन यांच्याशी लग्न केले. १९९३ मध्ये एकदा सारा यांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने दावा केला की त्याच्याकडे बेंजामिन आणि त्याच सल्लागार रूथ बारचा खासगी व्हिडीओ आहे.

याबाबत विचारले असता बेंजामिन यांनी रडत सारा यांना सत्य सांगितले. त्यांनी इस्रायली टीव्हीवर कबूल केले की मी साराला फसवले होते. जेव्हा टेप लीक झाली तेव्हा सारा यांनी रुथ बारला भ्रष्ट म्हणत ती स्वतः माझ्या पतीकडे आली होती असं म्हटलं.