काचेच्या भिंती अन् ५०८ मीटरची उंची! दोरीशिवाय १०१ मजले चढून एलेक्स होनोल्डने रचला नवा इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 15:05 IST2026-01-27T14:57:17+5:302026-01-27T15:05:37+5:30
Climber Alex Honnold: जगप्रसिद्ध अमेरिकन रॉक क्लाइंबर एलेक्स होनोल्ड याने पुन्हा एकदा अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. तैवानमधील १०१ मजली भव्य गगनचुंबी इमारत 'तैपेई १०१' वर एलेक्सने कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय, दोरीशिवाय आणि हार्नेसशिवाय यशस्वी चढाई केली आहे.

साधारण ५०८ मीटर उंच असलेल्या या काचेच्या आणि पोलादाच्या इमारतीवर एलेक्सने केवळ आपल्या हातांच्या आणि बोटांच्या जोरावर विजय मिळवला आणि एलेक्स होनोल्डने तैवानमध्ये अंगावर काटा आणणारा पराक्रम रचला.

एलेक्सने ही ऐतिहासिक चढाई केवळ १ तास ३१ मिनिटांत (९१ मिनिटे) पूर्ण केली. महत्त्वाचे म्हणजे, २०१४ मध्ये फ्रेंच गिर्यारोहक अलेन रॉबर्ट याने याच इमारतीवर चढाई करण्यासाठी ४ तास घेतले होते आणि त्यांनी सुरक्षा दोरखंडांचा वापर केला होता.

एलेक्सने सुरक्षा साधनांशिवाय हा वेळ निम्म्याहून कमी करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. या संपूर्ण चढाईचे नेटफ्लिक्सवर जगभर 'लाईव्ह' प्रक्षेपण करण्यात आले होते.

तैपेई १०१ इमारतीची रचना बांबूच्या काठीसारखी असून ती अतिशय गुळगुळीत आणि निसरडी आहे. एलेक्सने इमारतीचे छोटे कोपरे, सजावटीचे किनारे आणि एल-आकाराच्या संरचनेचा आधार घेत वरचा प्रवास सुरू केला.

एलेक्सने सांगितले की, "वरच्या मजल्यांवर वारा इतका वेगवान होता की संतुलन राखणे हे सर्वात मोठे आव्हान होते. पण तिथून दिसणारे तैपेई शहर अविश्वसनीय आणि सुंदर होते."

गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी असलेल्या या इमारतीखाली लोकांची मोठी गर्दी जमली होती. एलेक्स जेव्हा वर चढत होता, तेव्हा खाली उपस्थित असलेल्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता. लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला एलेक्स जेव्हा शिखरावर पोहोचला, तेव्हा संपूर्ण परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने आणि जल्लोषाने दुमदुमून गेला. एलेक्सने वर पोहोचल्यावर हात उंचावून सर्वांचे आभार मानले.

एलेक्सने या चढाईनंतर म्हटले की, "माझा उद्देश केवळ तमाशा करणे नसून लोकांना प्रेरित करणे आहे. आयुष्य मर्यादित आहे आणि त्याचा वापर अर्थपूर्ण कामांसाठी केला पाहिजे." या पराक्रमाबद्दल तैवानच्या राष्ट्रपतींसह 'बेअर ग्रिल्स' सारख्या जगप्रसिद्ध साहसी व्यक्तींनीही एलेक्सचे कौतुक केले आहे.

















