दुर्दैवी... ओमानच्या समुद्रात उसळलेल्या लाटेत मराठमोळं कुटुंब हरपलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 22:10 IST2022-07-13T21:50:56+5:302022-07-13T22:10:16+5:30
म्हमाणे कुटुंबातील वडील, मुलगा आणि मुलगी बेपत्ता झाल्याचे वृत्त समजताच जतमध्ये हळहळ व्यक्त झाली. तर, सोशल मीडियातूनही सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.

कामानिमित्त दुबई येथे स्थायिक झालेले तिघे बाप-लेक ओमान येथे पर्यटनासाठी गेल्यानंतर समुद्रात बेपत्ता झाले आहेत. ही घटना रविवारी घडली.
गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा शोध लागलेला नाही. शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षांची मुलगी श्रुती व सहा वर्षांचा मुलगा श्रेयस अशी बेपत्ता झालेल्या तिघांची नावे आहेत.
या घटनेला जत येथील त्यांचे बंधू वकील राजकुमार म्हमाणे यांनी दुजोरा दिला आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सर्वांनीच हळहळ व्यक्त केली
शशिकांत म्हमाणे दुबई येथील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये यांत्रिकी अभियंता आहेत. अनेक वर्षे ते संयुक्त अरब अमिरातीमधील विविध कंपन्यांमध्ये अभियंता पदावर कार्यरत आहेत.
कुटुंबासह ते दुबईमध्येच स्थायिक झाले आहेत. रविवारी ईदच्या सुटीनिमित्त ते पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती व अन्य काही मित्रांसोबत पर्यटनासाठी दुबईपासून जवळच असलेल्या ओमान येथील समुद्र किनाऱ्यावर गेले होते.
अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणामध्ये सहलीसाठी निघाल्याचा एक व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. तर, या सहलीचे फोटोही त्यांनी आनंदाने शेअर केले होते.
ओमान येथील सलालाह समुद्रकिनारी प्रचंड लाटा उसळत असताना त्याठिकाणी हे सर्वजण समुद्रस्नानाचा आनंद घेत होते. अचानक एक मोठी लाट आल्याने शशिकांत म्हमाणे, त्यांची मुलगी श्रुती व मुलगा श्रेयस हे तिघेही समुद्रात बेपत्ता झाले.
म्हमाणे कुटुंबातील वडील, मुलगा आणि मुलगी बेपत्ता झाल्याचे वृत्त समजताच जतमध्ये हळहळ व्यक्त झाली. तर, सोशल मीडियातूनही सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काळीज हेलवणारी ही घटना असल्याचं सांगत अनेकांनी पावसाळ्यात पाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला मित्रपरिवाराला दिला. तसेच, सेल्फी अन् फोटापेक्षा जीव महत्त्वाचा हेही अनेकांनी सांगितलंय.