Russia vs Ukraine War: चीननं रशियाला दिला दगा? सैन्याच्या 'त्या' ६४ किमी ताफ्याची काय अवस्था झाली बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 07:26 PM2022-03-05T19:26:23+5:302022-03-05T19:29:15+5:30

Russia vs Ukraine War: चीननं मित्र राष्ट्र रशियाला मोठा दगा दिल्याची चर्चा

युक्रेन विरुद्ध रशिया युद्धाचा आजचा दहावा दिवस आहे. या दहा दिवसांत युक्रेननं बड्या रशियाला अनेक धक्के दिले आहेत. बलाढ्य रशियन सैन्याला युक्रेनच्या सैन्यानं चांगली लढत दिली आहे.

युक्रेनचं सैन्य रशियावर अवघ्या काही दिवसांत गुडघे टेकेल असं अनेकांना वाटलं होतं. मात्र युक्रेननं भल्याभल्यांचे अंदाज चुकवले. युक्रेनवर निर्णायक हल्ला करण्यासाठी रशियन सैन्याचा तब्बल ६४ किलोमीटर इतका मोठा ताफा निघाला होता. हा ताफा नेमका आहे कुठे असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.

काही दिवसांपूर्वीच रशियाच्या ६४ किमी लांब ताफ्याचे फोटो व्हायरल झाले होते. राजधानी कीव्हकडे निघालेला हा ताफा सध्या क्वीवपासून ३२ किलोमीटर अंतरावर आहे. रशियाचा विशाल ताफा युक्रेनी सैन्याकडून मिळत असलेल्या कडव्या प्रत्युत्तरामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे अडकला असावा, अशी शक्यता ब्रिटिश संरक्षण मंत्रालयानं वर्तवली आहे.

रशियाच्या विशाल ताफ्यानं गेल्या तीन दिवसांत फार अंतर कापलेलं नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या ६४ किमीच्या ताफ्यानं २४ ते ३६ तासांत फारशी आगेकूच केलेली नाही. युक्रेनी सैन्य चिवटपणे प्रतिकार करत असल्यानं रशियन ताफ्याचा वेग कमी झाला असावा, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली.

रशियन ताफ्याचा वेग कमी होण्यास चीनमध्ये तयार झालेले टायर जबाबदार असल्याचा दावा पेंटागॉनमधून निवृत्त झालेले अधिकारी आणि इतिहास ब्लॉगर ट्रेंट टेलेंको यांनी केला. टेलेंको यांनी जवळपास १० वर्षे अमेरिकन सैन्यात वाहन लेखापरीक्षक म्हणून काम केलं आहे.

रशियाचा ताफा थांबण्यास चीनचे स्वस्त टायर कारणीभूत असू शकतात, असा अंदाज टेलेंको यांनी वर्तवला. त्यांनी चिखलात रुतलेल्या एका रशियन पँटिर-एस १ क्षेपणास्त्र प्रणालीचा फोटो शेअर केला हे. चीनचे स्वस्त टायर चिखल असलेल्या भागांत कसे कुचकामी ठरतात, ते टेलेंको यांनी फोटोतून दाखवलं आहे.

सैन्याच्या ट्रकचे टायर अनेक महिने एकाच ठिकाणी ठेवल्यावर ऊन आणि ओलाव्यामुळे ते कमजोर होऊ लागतात, असं टेलेंको म्हणाले. अमेरिकन अर्थतज्ज्ञ, सरकारी सल्लागार आणि टायरचे तज्ज्ञ असलेल्या कार्ल मुथ यांनीही टेलेंको यांच्या सुरात सूर मिसळला.

चिनी टायरचा दर्जा अतिशय खराब असतो. ते लवकर घासले जातात. वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर लवकर जाणवतो. बराच वेळ मातीच्या संपर्कात आल्यामुळे चिनी टायरवर दबाव येत आहे. त्यामुळे चिखल असलेल्या भागात ते रुतून बसत आहेत. परिणामी रशियाच्या ताफ्याचा वेग मंदावलाय, असं मुथ यांनी सांगितलं.