Russia-Ukraine Crisis: युक्रेननंतर आणखी एका देशावर हल्ला करण्याच्या तयारीत रशिया? NATO सोबत वाढली होती जवळीक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 05:35 PM2022-04-10T17:35:18+5:302022-04-10T17:44:52+5:30

फिनलँडच्या संरक्षण मंत्रालयाचे स्थायी सचिव एसा पुलकिनेन म्हणाले, रशिया प्रतिक्रिया नक्कीच देणार. मात्र, तो ती कशा स्वरुपात देईल हे सांगणे कठीन आहे. पण आपल्याला त्यासाठी तयार रहावे लागेल.

रशिया-युक्रेन युद्धादरम्यानच फिनलँडला नाटो देशांसोबत असलेली जवळीक महाग पडू लागली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलेंस्की जेव्हा फिनलँडच्या संसंदेत संबोधित करत होते, तेव्हाच फिनलँडवर सायबर हल्ला झाला. एवढेच नाही, तर त्यांच्या हवाई हद्दीतचे उल्लंघन झाल्याची घटनाही समोर आली आहे.

फिनलँडच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी ट्विट करत माहिती दिली होती, की शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर हल्ला झाला. हल्ल्याची माहिती मिळताच वेबसाइट बंद करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, घटनेच्या तपासानंतर वेबसाइट पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

सरकारी वेबसाइट्सवरील सायबर हल्ल्यापूर्वी फिनलँडने सांगितले होते, की रशियाच्या आयएल-96-300 या विमानाने तीन मिनिटांसाठी हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. हे विमान फिनलँडच्या हवाई हद्दीत आल्यानंतर, काही वेळातच परतले. फिनलँडची 1300 किलोमीटर एवढी सीमा रशियाला लागून आहे.

फिनलँडचे युक्रेनला समर्थन - रशिया युक्रेन युद्धात फिनलँड युक्रेनच्या बाजूने उभा आहे. आगामी काही महिन्यांत फिनलँड नाटो देशांमध्येही सामील होऊ शकतो. यामुळेच रशिया भडकलेला असून सायबर हल्ले तथा हवाई हद्दीचे उल्लंघन करून धमकावण्याचा प्रयत्नकरत आहे, असे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे. तसेच, नाटो देशांच्या जवळ जाणारा फिनलँड हा रशियाचे पुढचे लक्ष्य असू शकतो, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

रशियाची प्रतिक्रिया नक्की येणार - यासंदर्भात बोलताना फिनलँडच्या संरक्षण मंत्रालयाचे स्थायी सचिव एसा पुलकिनेन म्हणाले, रशिया प्रतिक्रिया नक्कीच देणार. मात्र, तो ती कशा स्वरुपात देईल हे सांगणे कठीन आहे. पण आपल्याला त्यासाठी तयार रहावे लागेल. आपल्याला आपल्या निर्णयांच्या परिणामांची तयारी ठेवावी लागेल. याच बरोबर, रशियाच्या धमक्यांचा सामना कशा प्रकारे करायचा याचीही आपल्याला तयारी करावी लागेल, असेही पुलकिनेन यांनी म्हटले आहे. पुलकिनेन हे फिनलँडच्या सैन्यात लेफ्टनंट जनरल म्हणून कार्यरत होते.

रशिया-फिनलँड तणाव वाढतोय - फिनलँड, रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. फिनलँडने नुकतेच दोन रशियन डिप्लोमॅट्सना आपल्या देशातून काढले आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फिनलंडने पुढील चार वर्षांत लष्कर बळकट करण्यासाठी 2.2 अब्ज डॉलर एवढा खर्च करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याशिवाय आधुनिक लष्करी शस्त्रे आणि उपकरणांच्या खरेदीसाठीही ते विचार करत आहेत.

रशियाने दिली आहे धमकी - युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात रशियाने फिनलँड आणि स्वीडनलाही नाटो देशांशी जवळीक केल्यास, जे राजकीय आणि लष्करी परिणाम होतील, त्यांसाठी तयार राहण्याचा इशारा दिला होता.

एवढेच नाही तर, कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी या दोन्ही देशांनी 2008 मध्ये जॉर्जिया आणि 2014 मध्ये युक्रेनवर केलेली कारवाई लक्षात ठेवावी, यानंतरच कोणताही निर्णय घ्यावा, असे रशियाने म्हटले होते.