CoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'?

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 23, 2020 08:18 PM2020-09-23T20:18:37+5:302020-09-23T20:29:05+5:30

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 75व्या वर्धापण दिनानिमित्त संबोधन केले. यावेळी त्यांनी न्यूयॉर्कसह संपूर्ण जगातील संयुक्त राष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना आपली Sputnik-V लस मोफत देण्यासंदर्भात भाष्य केले आहे.

जगभरातील वैज्ञानिकांनी या लशीच्या मोठ्या प्रमाणावर वापरासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. एवढेच नाही, तर या लशीच्या संभाव्य साइड इफेक्ट्ससंदर्भातही संपूर्ण जगात शंकेचे वातावरण आहे.

आपल्या प्री-रेकॉर्डेड भाषणात पुतीन म्हणाले, 'आपल्यापैकी कुणालाही या घातक व्हायरची लागण होऊ शकते. संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय आणि विभागीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

पुतीन म्हणाले, 'रशिया संयुक्त राष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक आणि योग्य ती मदद देण्यास तयार आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना आणि लस तयार करण्यात सहकार्य करणाऱ्या कंपन्यांना हे औषध मोफत देणे, हा आमचा हेतू आहे.'

रशियाने गेल्या महिन्यातच या लशीची घोषणा केली होती. तेव्हा पुतीन यांनी स्वतःच आपल्या मुलीनेही ही लस घेतल्याचे म्हटले होते.

पुतीन म्हणाले, त्यांची ही ऑफर म्हणजे, एका लोकप्रिय मागणीचेच प्रतिक आहे. वास्तवात, संयुक्त राष्ट्रातील काही सहकाऱ्यांनी यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र, अद्याप यावर यूएन स्टाफने कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. जिनेव्हामध्ये 'जागतिक आरोग्य संघटने'चे प्रवक्ते डॉ. मार्गारेट हॅरिस यांनीही, यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

'लँसेट जर्नल'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या लशीच्या डेव्हलपर्सनी ही लस सुरक्षित असल्याचा दावा केला होता. तीन आठवड्यातच सर्व 40 जणांमध्ये अँटीबॉडी रिस्पॉन्स बघायला मिळाल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, यात लस घेणाऱ्या स्वयंसेवकांना केवळ 42 दिवसच मॉनिटर करण्यात आले होते. यात कुठल्याही प्रकारच्या प्लेस्बो अथवा कंट्रोल लशीचा वापर करण्यात आला नव्हता.

या लशी शिवाय, जगभरातील अनेक लशींचे सुरुवातीच्या टप्प्यात चांगले परीणाम आले आहेत. यामुळे या लशींमध्ये लोकांना संसर्गापासून वाचवण्याची क्षमता आहे का? हे पाहण्यासाठी जगातील अनेक देशांत लाखो लोकांवर या लशींचे परीक्षण करण्यात येत आहे. या लशींचा काही साईड इफेक्ट असेल, तर त्याची माहिती मोठ्या स्तरावर लशीचे परीक्षण केले गेले तरच समजू शकते.

रशियन माध्यमांनी सोमवारी म्हटले आहे, की WHOचे विभागीय संचालक (युरोप) हॅन्स क्लग यांनी रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांची मॉस्कोत भेट घेतली. यावेळी त्यांनी या लशीचे कौतुक केले.

Tass न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, क्लग म्हणाले, 'कोरोना व्हायरसविरोधात लस तयार करण्यासंदर्भात WHO रशियाच्या प्रयत्नांची प्रशंसा करते. तसेच त्यांनी Sputnik V सुरक्षित आणि प्रभावी असल्याचेही म्हटले आहे.'